
अख्ख्या सिल्लोडचा सातबारा स्वतःच्या नावावर करून घेणारे ‘कारनामा’ फेम मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे चव्हाटय़ावर आणणारे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यावर तहसील कार्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला. सत्तार यांच्या पीएंच्या ताफ्यातील एक बबलू चाऊस याच्यासह तिघांनी शंकरपेल्ली यांना बेदम मारहाण केली.
सिल्लोड शहरातील सर्व्हे क्रमांक 90, 91 आणि 92 वर अब्दुल सत्तार यांनी बेकायदा कब्जाच केला आहे. यापैकी सर्व्हे क्रमांक 92 मधील सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीने दानपत्र करून दिलेल्या जागेच्या फेरफारावर (30992) महेश शंकरपेल्ली यांनी आक्षेप घेतला आहे. आज या आक्षेपावर सिल्लोड तहसील कार्यालयातील तलाठी सज्जामध्ये सुनावणी होती. तब्बल दोन तास ही सुनावणी चालली. त्यानंतर महेश शंकरपेल्ली हे सज्जातून बाहेर पडतानाच सत्तारांच्या पीएंच्या ताफ्यातील एक असलेला बबलू चाऊस, शाकेर मिया जानी, बबलू पठाण, शेख अब्दुल बासीद शेख सादिक, अकील बापू देशमुख यांच्यासह इतर तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली.
अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवले
नॅशनल एज्युकेशन सोसायटीचा गोलमाल चव्हाटय़ावर आल्याने तीळपापड झालेल्या सत्तारांच्या चेल्याचपाटय़ांनी आंबेडकरनगरातील राजेश्वर आरके याला हाताशी धरून शंकरपेल्ली यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. शंकरपेल्ली यांच्या तक्रारीवरून शाकेर मिया जानी, बबलू चाऊस, बबलू पठाण, शेख बासिद, अकील देशमुख यांच्यासह इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


























































