वांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले

26

सामना प्रतिनिधी, मुंबई

वांद्रे पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवर असलेल्या या इमारतीत दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी ही आग लागली आणि कर्मचाऱयांपासून अग्निशमन दलापर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली.

इमारतीच्या शेजारीच अग्निशमन केंद्र असल्याने मदत तत्काळ पोहचली, पण आगीचे रौद्ररूप पाहून आणखी 14 गाडय़ा घटनास्थळी बोलावण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन कर्मचाऱयांची झुंज सुरू झाली. आगीवर नियंत्रण तर मिळवायचे होतेच, पण इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱयांचीही सुटका करायची होती. जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. धुराच्या प्रचंड लोटात एक जवान गुदमरला पण अखेर इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या सर्व कर्मचाऱयांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाने यश मिळवले. एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पहिल्याच अग्निपरीक्षेत ‘समर’ रोबो यशस्वी
धगधगत्या आगीत थेट प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवणारा ‘समर’ रोबो पहिल्याच अग्निपरीक्षेत यशस्वी ठरला आहे. वांद्रे येथील एमटीएनएल कार्यालयात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने ‘समर’चा पहिल्यांदाच यशस्वी उपयोग केला. ‘लेव्हल-4’ची सर्वात मोठी आग विझवण्यासाठी रोबोची मोठी मदत झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ातच बुधकारी अग्निशमन दलाच्या ताफ्यात आग विझवणारा ‘समर’ रोबो दाखल झाला आहे. आगीत थेट उडी घेऊन आग विझवणारा हा रोबो 1 कोटी 12 लाख रुपये खर्च करून आणला गेला आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा देशातील पहिलाच रोबो आहे. 700 अंश सेल्सियस तापमानात हा रोबो काम करू शकणार आहे. 300 मीटरपर्यंत त्याचे रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे. वांद्रय़ाच्या आगीत या रोबोचा वापर करण्यात आला. एका मिनिटाला 3800 लिटर पाण्याचा फवारा या रोबोच्या माध्यमातून करता येतो.

एमटीएनएल आगीची चौकशी गरजेची -ऍड. शेलार
वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी होण्याची गरज शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि स्थानिक आमदार ऍड. आशीष शेलार यांनी व्यक्त केली.

ऍड. आशीष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागल्याचे कळातच त्यांनी तत्काळ मंत्रालयातून घटनास्थळी धाव घेतली. पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन दल यांचे बचावकार्य सुरू असताना इमारतीच्या परिसरातच तळ ठोकून होते. या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा होती का, स्प्रिंकलर होते का, सर्व्हर रूम चौथ्या मजल्यावर प्लॅनप्रमाणे होता का, फायर ऑडिट झाले होते का, आपत्कालीन सूचना देणारी यंत्रणा होती का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी होण्याची गरज आहे. मी याबाबत घटनास्थळाचा व मदतकार्याचा आढावा घेतला असून अधिकाऱ्यांकडून माहितीही जाणून घेतली आहे याबाबत मी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करेन, असेही आशीष शेलार म्हणाले.

इमारतीत एकच पळापळ, जीव वाचवण्याची धडपड
आग लागली तेव्हा काही कर्मचारी पाचव्या मजल्यावरील कॅण्टीनमध्ये जेवत होते. घटना समजताच त्यांचा घास घशातच अडकला आणि त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. समीर नावाच्या कर्मचाऱयाने धाडस दाखवून 25 जणांचा मेन डिस्ट्रिब्युशन फ्रेमपर्यंत नेले आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला आहे हे लक्षात येताच या सर्वांना टेरेसवर नेले. प्रत्येक मजल्यावर अशी जीव वाचवण्याची धडपड सुरू होती आणि प्रत्येकजण टेरेसच्या दिशेने धावत होता. इमारतीची टेरेस हाच आता त्यांचा एकमेव आधार होता. आगीचे, धुराचे लोट येथपर्यंत पोहचण्याअगोदरच अग्निशमन दलाचे जवान येथे पोहचावेत यासाठी देवाचा धावा सुरू होता. अरुणा केणी या महिला कर्मचाऱयानेही यावेळी धीराची कामगिरी केली.

अश्रू, धाकधूक आणि विचारपूस
अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीबाहेर आणल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना पाहून कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. महिला कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. प्रत्येक जण आपल्या सहकाऱ्याला मिठी मारून देवाचे आभार मानत होते. या आगीचे वृत्त कळताच प्रभादेवी, दादर आधी एमटीएनएल कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी वांद्रय़ाच्या दिशेने धाव घेतली. कोण बाहेर आलं, कोण आत अडकलंय अशी विचारपूस करण्यास सुरुवात केली.

सहाव्या मजल्यावरील विभागात नियमितपणे काम करीत असताना अचानक आग लागल्याची बोंबाबोंब झाली. आम्हा सर्वांना तातडीने गच्चीवर नेण्यात आले. सर्वत्र धूर पसरला होता. त्यामुळे पाण्यात बुडवलेले रुमाल आम्हाला नाकावर धरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिकांनी आम्हाला सुखरूप इमारतीखाली आणले. हा सर्व प्रकार थरारक होता.
-तेजू टि. कोली, वर्क असिस्टंट

मी तळमजल्यावर काम करते. दुपारी जेवण करण्यासाठी म्हणून पाचव्या मजल्यावरील कॅण्टीनमध्ये गेले होते. साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याची बोंब उठली आणि सर्वजण सैरावैरा पळत सुटले. आग लागली पण धूर इतका पसरला होता की काहीच समजेनासे झाले होते. अशाही परिस्थितीत आम्हाला गच्चीवर नेण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आम्हाला क्रेनच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरवले.
-अमृता कालुष्टे, कर्मचारी

दुपारी साडेतीनच्या सुमारास कार्यालयात अचानक प्रचंड हाहाकार उडाला. आग लागल्याचे आम्हाला सांगण्यात आले तेव्हा सर्वांची पाचावर धारण बसली. सर्वत्र धूर इतका पसरला की आता आपले खरे नाही असाच विचार मनात आला. इमारतीची वीज बंद करण्यात आली, पण त्याही परिस्थितीत आम्हाला आठव्या मजल्यावर नेण्यात आले. तेथून मग अग्निशमन दलाच्या जवानाने इमारतीबाहेर काढले. आज मृत्यूला जवळून पाहिले.
-करुणा भोगले, डीएमए ऑफिस

आपली प्रतिक्रिया द्या