मलेरिया, डेंग्यूमुळे मुंबईकर तापाने फणफणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सध्या पावसाचा जोर नसला तरी पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. गेल्या 10 ते 18 सप्टेंबर या सात दिवसांत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. दरम्यान, घाबरून जाऊ नये, स्वच्छता राखा आणि घरात आणि घराबाहेर पाणी साठू देऊ नका, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

जून महिना सुरू झाल्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. जून महिना कोरडा गेला तर जुलै महिन्यात वरुणराजा बरसला. पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली तर सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पाऊस मुसळधार बरसलाच नाही. मात्र पावसाळय़ातील साथीच्या आजारांचा फैलाव सुरुवातीपासून मोठय़ा प्रमाणात होत राहिला. 1 ते 10 सप्टेंबरच्या तुलनेत 10 ते 18 सप्टेंबर आठवडय़ात रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, कावीळ व चिकनगुनिया या साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत 9 लाख 95 हजार 750 घरांची झाडाझडती घेतली असून 49 लाख 78 हजार 750 लोकांचे सर्वेक्षण केले. यात 93 हजार 342 जणांचे रक्ताचे नमुने घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार पसरतात तर डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी रहिवाशांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी!

गॅस्ट्रो, कावीळ व टायफॉइड या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, पाणी जास्तीत जास्त प्यावे, रस्त्यांवरील उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.