
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर व तालुक्यातील गावात भरणारे सर्व आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी सोमवारी दिले आहेत.
दरम्यान, मालवणचा सोमवार आठवडा ‘अपना बाजार’ बंद ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी केल्या होत्या. त्याबाबतचे पत्र तहसील प्रशासनाकडून पालिकेला पाठविण्यात आले असतानाही सोमवारचा आठवडा बाजार भरला गेला. विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बाजार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे प्रांताधिकारी यांनी दिलेला आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावला असे सांगत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आक्रमक बनले. नगराध्यक्ष यांनी आमदार वैभव नाईक तसेच तहसीलदार अजय पाटणे यांचे याबाबत लक्ष वेधले. आमदार नाईक यांनी तात्काळ दखल घेत आठवडा बाजार सुरू ठेवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण घ्या, अश्या सूचना तहसीलदार अजय पाटणे यांना दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आठवडा बंद ठेवण्याचा प्रांताधिकारी व नगराध्यक्षांचा आदेश मुख्याधिकाऱ्यांनी धुडकावून आठवडा बाजार सुरू ठेवला. प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार रविवारी तहसील प्रशासनाने पालिका प्रशासनास आठवडा बाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार आठवडा बाजार बंद राहील असे आवाहनही करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी जिल्ह्याबाहेरील विक्रेते आठवडा बाजारात दाखल झाले. याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी या विक्रेत्यांना रोखले. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी भाजी विक्रीमुळे काहीही होणार नाही असे सांगत बाजार सुरू ठेवला तसेच व्यापाऱ्यांकडून वसुलीही करण्यात आली, याबाबत नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेच्या व्यवसायाच्या विरोधात आपण नाही मात्र राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता वरिष्ठ प्रशासनाचे आदेश पळाले गेलेच पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले. बाजाराच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या दृष्टिकोनातून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाजाराबाबत स्पष्टीकरण द्या
नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी तहसीलदार पाटणे यांचे लक्ष वेधले असता मुख्याधिकारी जावडेकर यांना तात्काळ तहसील कार्यालयात बोलावून घेण्यात आले. वरिष्ठांचे आदेश असतानाही बाजार कोणत्या आधारे सुरू ठेवण्यात आला याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच स्पष्टीकरण मागवले आहे.
























































