
केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्व विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न विविध पक्षातील नेत्यांकडून देशपातळीवर सुरू झाले आहेत. त्यातच आत्तापर्यंत कॉँग्रेसच नेतृत्व स्विकारण्यास नकार देणाऱया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसची साथ देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यासाठी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसला मदत करण्याची अट त्यांनी घातली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत तृणमूल कॉँग्रेसची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. कर्नाटकचा निकाल हा भाजप विरोधातील जनादेश आहे. मी जादूगार नाही, ज्योतिषीही नाही. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते की, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिथे भाजप लढू शकत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेस बलवान आहे. त्यामुळे आम्ही बंगालमध्ये लढू. काँग्रेसने दिल्लीत लढावे. नितीशकुमार आणि तेजस्वी बिहारमध्ये एकत्र आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना प्राधान्य द्यावे लागेल. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही आपल्याला एकत्र काम करावे लागेल.
काँग्रेसने इतर पक्षांनाही साथ द्यावी
आम्ही माहिती काढल्याप्रमाणे काँग्रेस 200 जागांवर मजबूत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला काही चांगले मिळवायचे असेल तर त्यांना काही क्षेत्रात त्याग करावा लागेल. ज्या जागांवर काँग्रेस पक्ष मजबूत आहे, त्या जागांवर ते भाजपशी लढू शकतात. तिथे आमचा पाठिंबा असेल. मात्र त्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांनाही साथ द्यावी लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
























































