
घर पाहण्याचा बहाणा करून महिलेचे दागिने घेऊन पळून गेलेल्याला अखेर दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. राजेश खानविलकर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
वांद्रे परिसरात महिला राहतात. त्यांचा दहिसर येथे एक फ्लॅट आहे. त्या फ्लॅटसाठी महिला या भाडेकरू शोधत होत्या. गेल्या महिन्यात महिलेला फेसबुकवर एक रिक्वेस्ट आली. ती रिक्वेस्ट महिलेने स्वीकारली. त्यानंतर राजेशने महिलेला त्याचा नंबर दिला. आपण गोवा येथे राहत असून मुंबईत फ्लॅट हवा असे त्याने महिलेला सांगितले. भाडेकरूसाठी महिलेने होकार दर्शवल्यानंतर 27 नोव्हेंबरला राजेश हा दहिसरला आला. महिलेने राजेशला त्यांचा फ्लॅट दाखवला. महिलेने गळ्यातील सोने काढून त्या हात पाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या.
त्या दागिन्यांवर राजेशची नजर पडली. चहा प्यायची असून त्यासाठी भांडे घेऊन येतो अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यानंतर सोन्याचे दागिने घेऊन राजेशने पळ काढला. काही वेळाने महिला बाहेर आल्या. त्यांना जागेवर दागिने दिसले नाहीत. त्यानंतर महिलेने राजेशला पह्न केला. त्याचा पह्न बंद येत होता. 3 लाख 50 हजार रुपयांचे दागिने चोरी प्रकरणी महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेश विरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 12 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील सहायक निरीक्षक मल्हार थोरात यांच्या पथकातील पांगे, जाधव यांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना राजेशची माहिती मिळाली. तो गोव्यात असल्याचे समजले. मात्र तो पुण्यात असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. पिंपरी-चिंचवड येथील बंड नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी राजेशला बेडय़ा ठोकल्या. त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत.
कसिनोमध्ये हरला
राजेश हा फसवणूक केल्यानंतर गोव्याला गेला. तेथे तो कसिनोमध्ये पैसे हरला. पैसे हरल्यानंतर तो सातारा येथे गेला. तेथे काही तास राहिल्यानंतर पुन्हा तो पुण्यात आला. पोलीस पकडतील या भीतीने त्याने मोबाईल फेकून दिला. त्या नवीन मोबाईल आणि सिम कार्ड खरेदी केले. राजेश हा त्याचा जोगेश्वरी येथील घराचा जुना पता देतो. तेथे आता इमारती झाल्याने त्याला शोधताना पोलिसांना अडचणी आल्या.






























































