
धावत्या लोकलमध्ये डब्यात गर्दी नसल्याचा गैरफायदा उचलत एका मद्यपी तरुणाने प्रवासी महिलेला मारहाण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. बोरिवली पोलिसांनी त्या तरुणाला बेडय़ा ठोकल्या आहेत.
सुरती (नाव बदललेले) या महिलेने मैत्रिणीला भेटून घरी जाण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानकात जलद लोकल पकडली. त्या फर्स्ट क्लासच्या महिला डब्यात दरवाजावर उभ्या असताना गोरेगाव स्थानकात एक दारूच्या नशेत असलेला तरुण त्या डब्यात चढला आणि दरवाजात पाय पसरून बसला. त्यामुळे सुरती यांनी त्याला तेथून उठण्याची विनंती केली असता त्याचा त्या तरुणाला राग आला आणि त्याने सुरती यांच्या कानाखाली लगावली. तसेच डोक्यात मारून दमदाटी केली. त्यावेळी डब्यातील दुसरी महिला सुरती यांच्या मदतीला आली असता आरोपीने दोघींना घाणेरडय़ा भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. त्यावेळी डब्यात तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानाकडे सुरती यांनी तरुणाची तक्रार केली. मग त्या जवानाने पकडून प्रफुल्ल पांचाळ (23) या तरुणाला बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

























































