आरबीआयच्या हेल्पलाईनवर फोन करणे पडले महाग, खात्यातून उडाले हजारो रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

भारतीय रिर्झव्ह बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. एका सेकंदात त्याच्या बँक खात्यातून 48,000 हजार रुपये गायब झाले आहेत. विजयकुमार मारवा असे या व्यक्तीचे नाव असून ते मालाड येथे राहतात.

मारवा यांना घरात साफ सफाई करताना 7000 रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. त्या बदलून मिळतील का याची चौकशी करण्यासाठी त्यांनी गूगलवर आरबीआयचा हेल्पलाईन क्रमांक सर्च केला. त्यावर मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी फोन केला. समोरच्या व्यक्तीने त्यांना जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या क्रेडीट कार्डची डिटेल्स मागितली. ज्यात त्यांचा पासवर्डही होता. त्यानंतर काही सेकंदातच मारवा यांना खात्यातून 48,000 रुपये काढल्याचा मेसेज आला .ते बघताच आपली फसवणूक झाल्याचे मारवा यांच्या लक्षात आले व त्यांनी पोलिसात याबद्दल तक्रार केली.

याबद्दल बोलताना महाराष्ट्र सायबर विभागाचे अधिक्षक बालसिंग राजपूत म्हणाले की सायबर गुन्हेगारांनी हल्ली नव्यानेच हे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांनीच बँकेची डिटेल्स कोणाला न देता प्रत्यक्ष बँकेत जावे व सावध राहावे. तसेच अधिकृत वेबसाईटच सर्च कराव्यात.