आंबे चोरले म्हणून बारा वर्षाच्या मुलाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । खगडीया

बागेतील आंबे तोडले म्हणून एका बागमालकाने १२ वर्षाच्या मुलाची डोक्यात गोळ्या घालून निघृणपणे हत्या केल्याची घटना बिहारमधील खगडीया येथे घडली आहे. सत्यम कुमार असे त्या मुलाचे नाव असून तो रमा यादव याच्या बागेतील आंबे चोरत होता.

खगडिया मधील गोगोरी गावात सत्यम कुमार हा त्याची आई विभूती यादव सोबत राहायचा. गुरुवारी शाळेतून आल्यानंतर सत्यम कुमार रमा यादवच्या बागेतील आंबे चोरायला गेला. त्यावेळी रमा यादव तेथेच खाटेवर झोपला होता. कुणीतरी बागेत घुसल्याची कुणकुण रमा यादवला लागल्यानंतर त्याने स्वत:कडील बंदूक घेऊन सत्यम कुमारवर गोळ्या झाडल्या. त्याच्या गोळीबारात दोन गोळ्या सत्यमच्या डोक्यात घुसल्या व त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळ्यांच्या आवाजाने गावकरी बागेजवळ जमा झाले. त्यांनी रमा यादवला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांच्या तावडीत सापडण्याआधीच तो तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलीस रमा यादवचा शोध घेत आहे. दरम्यान पोलिसांनी रमा यादवच्या कुटुंबियांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची बायको व मुले देखील फरार असल्याचे पोलिसांना समजले.