मंगलप्रभात लोढांनी शिंदे गटाच्या गद्दारीची आग्र्यातील सुटकेशी तुलना; जनतेत संतापाची लाट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. लोढा यांनी मिंधे गटाच्या गद्दारीची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली आहे.

“”छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले”, , असं वादग्रस्त वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. किल्ले प्रतापगडावरील 364 व्या शिवप्रतापदिनाच्या सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे उपस्थित होते.

यावरून शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ”ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, त्यांची तुलना महाराजांसोबत केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्राचं खच्चीकरण करणे हा एकमेव डाव या सरकारचा आहे. राज्यपाल जसे बोलतात तसेच यांचे मंत्री बोलतात. त्यामुळे आता लोकांसमोर वस्तुस्थिती आली आहे. हा केवळ शिवाजी महाराजांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. मंगलप्रभात लोढा हे मुंबईची रिअ‍ॅलिटी ओळखणारे नाहीत तर रिअल्टी ओळखणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खच्चीकरण हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. राज्यपालांना खोके सरकारने पदमुक्त करायला हवं होतं. मात्र एकाही मंत्र्यांकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही” असे आदित्य ठाकरे म्हणाले