मोठी बातमी – मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव स्वीकारला

मणिपूर हिंसाचाराप्रकरणी विरोधकांनी सदनात जाब विचारण्याचे सत्र आजही सुरू ठेवले. विरोधकांची आघाडी अर्थात ‘इंडिया’ने मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यावरील चर्चेस मंजुरी दिली आहे. मणिपूर प्रकरणी मोदींनी सदनात येऊन उत्तर द्यावे ही मागणी करत हा अविश्वास ठराव मांडण्यात आला होता.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी इंडियाच्या वतीने हा प्रस्ताव मांडला होता. गोगोई यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर लोकसभा अद्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रस्तावाच्या बाजूने कितीजण आहेत हे विचारले. बिर्ला यांनी हा प्रस्तान स्वीकारला असून यावरील चर्चेची तारखी नंतर ठरवली जाईल असे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सदनाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. 20 जुलैपासून संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली असून मणिपूर हिंसाचारावरून दोन्ही सदनाचे कामकाज अनेकवेळा गोंधळामुळे बंद पडले आहे.

हा प्रस्ताव मांडणारे गोगोई हे आसाममधील कालियाबोर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. गोगोई यांच्याव्यतिरिक्त भारत राष्ट्र समितीने देखील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाबाबात बोलताना केंद्रीय मंत्री अर्जन राम मेघवाल यांनी म्हटले की, प्रस्ताव येऊ द्या आम्ही कोणत्याही चर्चेसाठी तयार आहोत.