मनीष सिसोदिया पुन्हा सीबीआयच्या रडारवर; दिल्लीतील कार्यालयावर छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर शनिवारी सीबीआयने छापा टाकला. सिसोदिया यांनी ट्विट करून या कारवाईची माहिती दिली. तपास यंत्रणेला माझ्याविरुद्ध काही मिळालेले नाही व मिळणारही नाही. कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही, असा दावा त्यांनी केला. सीबीआयने मात्र छापेमारीचे खंडन केले. सिसोदिया यांच्याविरोधात गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही छापा टाकण्यात आला होता.

उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या अनुषंगाने सुरु असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही छापेमारी केल्याचे बोलले जात आहे. छापेमारीचे अधिकृत कारण उघड झालेले नाही. सिसोदिया यांनी शनिवारी दुपारी ट्विट केले. आज पुन्हा एकदा सीबीआय पथक माझ्या कार्यालयात दाखल झाले आहे. मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी माझ्या घरावर छापेमारी केली. कार्यालयातही छापेमारी केली. माझ्या लॉकरची तपासणी केली. माझ्या गावापर्यंत चौकशी केली. मात्र माझ्याविरुद्ध काहीही मिळालेले नाही व भविष्यातही मिळणार नाही. कारण मी काहीही गैर केलेले नाही, असा दावा सिसोदिया यांनी केला. सीबीआयने मात्र या छापेमारीच्या वृत्ताचे खंडन केले. आपले अधिकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी सिसोदिया यांच्या कार्यालयात गेले होते, छापेमारी केलेली नाही, असे तपास यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.