
मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक विधीमंडळात एकमताने मंजूर झाले. मात्र हे विधेयक म्हणजे सरकारने केलेली फसवणूक असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी सरकारने मंजूर केलेले विधेयक आपल्याला मान्य नसल्याचे सांगत बुधवारी 12 वाजता आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असा इशारा सरकारला दिला आहे. यासोबतच जरांगे यांनी सरकारकडून देण्यात येत असलेले वैद्यकीय उपचार देखील बंद केले आहेत.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”सरकारचं हे आरक्षण पुढे जाऊन टिकेल की नाही ते देखील माहित नाही. कदाचित निवडणूक असे पर्यंत टिकेल नंतर काय आमच्या पोरांनी काय फाशी घ्यायची का?, असा संतप्त सवाल देखील जरांगे यांनी केला आहे.
”आम्ही सरकारच्या निर्णयाचं आधीही स्वागत केलं होतं. आताही स्वागत करतो. पण मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसीत नोंदी सापडल्या आहेत. कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. ते आम्ही मिळवणारंच. उद्या आम्ही आंदोलनाची घोषणा करू. आंतरवालीत उद्या बैठक होणार आहे. ही निर्णायक बैठक असेल. त्यासाठी सर्व मराठ्यांनी उद्या आंतरवालीत सराटीत यावं, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.
”सराकराने दिलेले हे आरक्षण टिकेल की नाही शंका आहे. याने गोरगरिब मराठ्यांचं काहीही भलं होणार नाही. आमची मागणी वेगळी होती आणि त्यांनी केलं वेगळंच आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला त्यामुळे त्य़ांना सहा महिन्यांचा वेळ दिला. प्रत्येक वेळी भावनात अडकून लेकराचं नुकसान करू शकत नाही. कॅबिनेटला काय अधिकार आहेत ते आम्हालाही माहित आहे. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करू नये”, अशी टीका जरांगे यांनी सरकारवर केली.
”आता मराठ्यांची शक्ती दाखवून देऊ. सरकारने चेष्ठा केलीय मराठा समाजाची. ज्या जनतेने तुमच्या डोक्यावर गुलाल उडवला. तुम्हाला राजगादीवर बसवले. त्यांना फसवताना काही वाटत नाही का?”, अशा सवाल देखील त्यांनी केला आहे.
























































