
माजलगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे या बीडकडे गेवराईमार्गे जात असताना त्यांचा ताफा सावरगाव येथे सकल मराठा समाजाच्या बांधवांनी अडवून त्यांना मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करा म्हणून जाब विचारला. यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मंगळवारी माजलगाव येथे खासदार प्रीतम मुंडे या एका हॉटेलमध्ये कामासाठी उपस्थित होत्या. दुपारी कार्यक्रम आटोपून जात असताना त्यांचा ताफा सकल मराठा समाजाच्या बांधवांनी सावरगाव येथील चौकात अडवून त्यांना जाब विचारला. आपण जिल्ह्यात आला की मराठा समाजाची पाठराखण करतात व त्यांना पाठिंबा देतात परंतू लोकसभेत बोलताना मराठा विरोधी बोलतात असा मराठा समाजाच्या बांधवांनी जाब विचारला. यावेळी त्यांनी मी कधीही मराठा समाजाच्या विरोधात बोललेली नाही, माझा मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही पहिल्यापासून भूमिका असून माझा मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी मागणी असून आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मराठा समाजाचे हनुमान फफाळ, राजाभाऊ शेजुळ, विजय दराडे, सोपान शिंदेसह अनेक जण उपस्थित होते.
























































