पडद्याआडून – मी अश्वत्थामा चिरंजीव, चिरंतन वेदनेचा दाहक आक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

महाभारताच्या अफाट विश्वात अनेक व्यक्तिरेखांच्या काळाच्या ओघात दंतकथा झाल्या; पण काही व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या केवळ कथानकापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर मानवी वेदना, अपराधगंड आणि अंतहीन संघर्षाचे प्रतीक होतात; अश्वत्थामा ही त्यापैकीच एक. त्याच्या चिरंजीवित्वामागचं गूढ, कपाळावरचा नीलमणी, गुरुवर्य द्रोणाचार्यांचा पुत्र असूनही अधःपतनाकडे झालेली त्याची वाटचाल आणि साक्षात भगवान श्रीकृष्णाने दिलेला शाप… या सगळ्याने अनेक पिढय़ांच्या कल्पनाशक्तीला कायमच वेढून ठेवले आहे. हाच गूढ आणि वेदनांचा प्रवास आता ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या नाटकातून रंगभूमीवर साकारला आहे.

प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते अशोक समेळ यांच्या गाजलेल्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या महाकादंबरीवर आधारित हे नाटक केवळ पौराणिक कथा सांगत नाही, तर आधुनिक काळाशी संवाद साधतं. गेल्या अकरा वर्षांत या कादंबरीच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यावरून अश्वत्थाम्याबद्दल असलेल्या कुतूहलाचा अंदाज येईल. त्या कादंबरीतून शब्दांच्या माध्यमातून उभा राहिलेला अश्वत्थामा आता रंगमंचावर प्रत्यक्ष अवतरतो आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातो. आताच्या पिढीच्या भाषेत सांगायचं तर अश्वत्थामा हा अँटी-हीरो आहे. महाभारतातील अनेक दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिरेखांपैकी एक, तरीही सर्वाधिक वलय असलेला आणि म्हणूनच त्याच्याविषयीची उत्सुकता कायम टिकवून ठेवलेला एक शापित काळपुरुष. त्याचे चिरंजीव असणं हेदेखील त्याच्यासाठी शाप ठरलं. स्मृती गमावून बसलेला आणि मुक्तीच्या शोधात आजही भटकत असलेला तो एक आत्मा आहे.

मात्र हा सारा प्रवास आपल्यासमोर अश्वत्थाम्याच्या दृष्टीतून उलगडत जातो. महाभारतातील आजवरचे संदर्भ आपल्याला त्याच्या बाजूने दिसतात आणि एक वेगळं सत्य समोर उभं राहतं. मात्र संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या भडिमारामुळे त्यातला संघर्ष आणि नाटय़ कुठेतरी मागे पडतं. एक जळजळीत वास्तव, प्रखर अभिनय आणि धारदार संवांदातून उभं केलं असतं तर या नाटकाने एक वेगळाच अनुभव दिला असता. तसंच नाटक द्विपात्री असल्यामुळे काही मर्यादा जाणवतात. ते महानाटय़ न होता एक संदर्भ नाटय़ होतं. तरीही त्या भळभळत असलेल्या जखमेची वेदना ते ठसठशीतपणे पोहोचवतं, हे विशेष आणि त्यामागे सगळ्यांचीच कठोर मेहनत आहे हे ही जाणवतं.

या नाटकाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे वयाच्या 84 व्या वर्षी स्वतः लेखक दिग्दर्शक अशोक समेळ यांनी अश्वत्थाम्याची भूमिका साकारणं. ही भूमिका ते केवळ अभिनय म्हणून करत नाहीत, तर जणू अनेक वर्षांच्या अभ्यास, चिंतन आणि संशोधनातून जन्माला आलेली एक मानसिक अवस्था ते रंगमंचावर जगतात. अश्वत्थाम्याच्या वेदना, संताप, अपराधाची जाणीव, सूडाची आग आणि अखंड भटकंती यांचा त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो. त्यांच्या संवादफेकीत अनुभवाची ताकद आहे, तर शरीरभाषेत एका शापित योद्धय़ाची असहाय्यता स्पष्ट जाणवते. धनश्री दामले यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा नाटकाला महत्त्वपूर्ण आधार देतात. विशेषतः द्रौपदीच्या व्यक्तिरेखेतून उभा राहणारा भावनिक संघर्ष प्रभावी ठरतो. द्रौपदी आणि अश्वत्थामा यांच्यातील संवाद हे या नाटकाचं एक मोठं बलस्थान आहे. सूड, क्षमा, वेदना आणि माणुसकी यांच्यामधील संघर्ष या प्रसंगांतून अत्यंत प्रभावीपणे उलगडतो.

नाटकाची मांडणी पारंपरिक पौराणिक चौकटीत अडकून राहत नाही. उलट आजच्या समाजातील हिंसा, द्वेष, युद्धजन्य मानसिकता आणि सूडभावना यांच्याशी त्याची सांगड घालते. त्यामुळे अश्वत्थामा ही व्यक्तिरेखा केवळ महाभारतातील राहत नाही, तर ती आजच्या अस्वस्थ काळाचं प्रतीक बनते. “वेदना संपत नाहीत; त्या चिरंजीव होतात’’ हा विचार नाटक संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहतो. सोबत धनश्री दामले यांनी साकारलेल्या विविध भूमिका हा काळाची बंधने ओलांडून एक मोठा अवकाश कवेत घेतात. हे नाटक द्विपात्री करणं हे आव्हानात्मक होतं, पण ते बऱ्याच अंशी यशस्वी झालं ते त्या कलाकारांचा अभिनय, नाटकाचा आकृतीबंध आणि तांत्रिक चमूचा भक्कम पाठिंबा यामुळेच.

तांत्रिकदृष्टय़ाही नाटक उल्लेखनीय ठरतं. विश्वास पिंपळे यांनी केलेलं प्रोजेक्टर नेपथ्य महाभारतकालीन वातावरण आणि आधुनिक संदर्भ यांच्यात प्रभावी दुवा तयार करतं. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना प्रसंगानुसार नाटय़मयता अधिक गडद करते. विशेषतः अश्वत्थाम्याच्या अंतर्मनातील संघर्ष दाखवताना प्रकाशछटांचा केलेला वापर लक्षवेधी ठरतो. संग्राम समेळ यांचं पार्श्वसंगीत प्रसंगांना आवश्यक ती भावनिक उंची देतं आणि नाटकाच्या वातावरणनिर्मितीत मोलाची भूमिका बजावतं. या नाटकामागे अशोक समेळ यांनी तब्बल पंचवीस वर्षे अभ्यास आणि संशोधन केल्याचं जाणवत राहतं. त्यामुळे नाटक कुठेही वरवरचं किंवा केवळ पौराणिक रंजन करणारे वाटत नाही. उलट ते एका व्यक्तिरेखेच्या मानसिक आणि तात्त्विक प्रवासाचा शोध घेणारं चिंतनशील नाटय़ होतं.

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे नाटक महाभारतातील एका गूढ व्यक्तिरेखेचा शोध घेत असताना माणसाच्या अंतर्मनातील वेदनांचाही मागोवा घेतं. आजच्या मराठी रंगभूमीवर आशय, अभ्यास आणि अभिनय यांची अशी एकत्रित मेजवानी क्वचितच पाहायला मिळते. म्हणूनच हे नाटक केवळ पाहण्याचा नाही, तर अनुभवण्याचा प्रवास ठरतो. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन मानवी मनाचा शोध घेण्याची तुमची तयारी असेल हे नाटक तुमच्यासाठी आहे. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ या उक्तीचा अनुभव महाभारतात वर्णन केलेल्या व्यक्तिरेखा जेव्हा आजही आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा येतोच. हा अश्वत्थामा आपल्याच आत कुठेतरी सापडेल असं वाटत राहतं.

लेखक आणि दिग्दर्शक : अशोक समेळ
कलाकार : धनश्री दामले आणि अशोक समेळ
नेपथ्य : विश्वास पिंपळे
प्रकाश : शीतल तळपदे
पार्श्वसंगीत : संग्राम समेळ
निर्मिती : ऋग्वेद नाटय़संस्था
सूत्रधार : दीपक गोडबोले
छायाचित्र सौजन्य : संजय पेठे