मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व २९ जूनपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तुळजापूर

आतापर्यंत ५८ मूक मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेत नाही. सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी येत्या २९ जूनपासून मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱया पर्वास तुळजापुरातून प्रारंभ होणार आहे. या पर्वाच्या नियोजनासाठी तुळजापुरात सुकाणू समितीसह मराठा संघटनांची बैठक झाली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दारात जागरण गोंधळ घालून या पर्वाची सुरुवात करण्यात येणार असून हे ‘मूक मोर्चे’ नसून ‘ठोक मोर्चे’ असणार आहेत, असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला.

 बुधवार, २० जून रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाची सुकाणू समिती तसेच मराठा समाजातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चित करावी, शैक्षणिक सवलतींचा अध्यादेश तत्काळ वाढावा, शेतकऱयांना संरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.