आरेरावी भाषा करणाऱ्या शंभुराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर राज्यभर बहिष्कार! मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय

माझेच खरे…, मी सांगेन तीच पूर्व…, मी मंत्री आहे…माझ्या अधिकारात काय करायचे ते करेन, तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही, अशी पत्रकारांवर अरेरावीची भाषा करत सुटलेल्या राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांच्या राज्यभरात होणाऱया पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे.

कोणत्याही प्रश्नाची माहिती न घेता पत्रकार परिषदेत पत्रकारांनाच ‘तुमचा प्रश्न अपुऱया माहितीच्या आधारे आहे’, असा एकतर्फी निवाडा करण्याचा तसेच ‘तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’, असे उत्तर देण्याचा प्रकार शंभुराज देसाई यांच्याकडून सातत्याने होत आहे. जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर त्याच्या पत्रकार परिषदेला जाण्यासाठी पत्रकारही बांधील नाहीत, अशी भूमिका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या देसाई यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सर्व संघटनांचाही पाठिंबा आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, दीपक शिंदे, सुजित आंबेकर, राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे, शंकर मोहिते, डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे, मराठी पत्रकार परिषद संलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद, जिह्यातील 11 तालुक्यांचे पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.