
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील खोपडी या गावातील नवविवाहित तरुणी आरती शामहारी त्रिभुवन(वय 20 वर्ष) हिचा मृतदेह घरा जवळीलच विहिरीत आढळून आला आहे. मृत आरतीच्या नातेवाईकांनी सासर कडील मंडळींनीच एक लाख रुपये हुंडा मागत असल्याचे सांगत आरतीचा खून केल्याचा आरोप केला आहे.
येवला तालुक्यातील सायगाव या ठिकाणी राहणाऱ्या आरती हिचा विवाह गेल्या वर्षी 30 एप्रिल 2018 रोजी कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे राहणाऱ्या शामहारी चांगदेव त्रिभुवन यांच्या सोबत झाला होता. सुरूवातीच्या काही दिवस तिला चांगले नांदवले. नंतर माहेरून हुंड्यात कबुल केलेले एक लाख रुपये आणावे यासाठी तिचा मागील काही दिवसांपासून छळ चालू होता. मकर संक्रांतीच्या सणासाठी आरतीचा भाऊ गणेश तिला आणण्यासाठी गेल्यानंतर आरती ही रविवारी सकाळी पासून बेपत्ता असल्याचे तिच्या सासरकडून सांगण्यात आले. तसेच भावाला तिचा शोध घेण्यासाठी विहिरीकडे घेऊन गेले. विहिरीमध्ये आरतीच्या चपला आणि मोबाईल पाण्यावर तरंगताना दिसल्याने गळ टाकून तिला वर काढण्यात आले. मृत आरती हिच्या हातावर आणि डोक्यावर जखमा असल्याने तिला मारून विहिरीत टाकले असल्याचा आरोप मृत आरतीचे चुलते, भाऊ, आई यांनी केला आहे.
आरतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून आरतीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्या दरम्यान खोपडी गावातील सरपंच त्यांच्या समवेत असणारे गावकरी त्यांच्यात आणि आरतीच्या माहेरकडील लोकांचे ग्रामीण रुग्णालयात वाद सुरु झाले होते. यावेळी आरतीच्या सासू सासरे,पती, दीर,यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरतीच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. याबाबत मयतांचे सासू सासरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून झालेल्या घटने बाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते .मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच आरतीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.



























































