शासनाने मास्कच्या किंमती कमी केल्यामुळे ग्राहकांना फायदा; जाल्यात मास्क घेण्याकडे नागरिकाचा कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाने मास्कच्या किंमती तिसऱ्यांदा कमी केल्या आहेत. औषध विक्रेत्यांनीही दुकानासमोर फलक लाऊन मास्कच्या किंमती कमी झाल्याचे दर्शविले आहे. शासनाने मास्कच्या किंमती कमी केल्यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे. मात्र, काही विक्रेत्यांनी आधी मोठ्या प्रमाणात मास्क खरेदी केले होते. त्यांचे काही प्रमाणात नुकसानन झाले आहे. मास्कच्या किंमती कमी झाल्याने अनेकांचा मास्क घेण्याकडे कल वाढला आहे.

कोरोना रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे औषधांच्या दुकानातून मास्कची विक्री करण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात मास्कचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला होता. या दरम्यान शासनाने परिपत्रक काढून मास्कच्या किंमती ठरवून दिल्या होत्या. त्यानुसार मास्कची विक्री करण्यात येत होती. त्यानंतर मागील आठवडयात शासनाने परिपत्रक काढून मास्कच्या किंमती तिसऱ्यांदा कमी केलेल्या आहेत. त्यानुसार आता एन 95 मास्कची किंमत 19 ते 49 रुपये, तीन पदरी डिस्पोबल मास्कची किंमत 4 रुपये तर दोन पदरी डिस्पोबल मास्कची किंमत3 रुपये ठरवून देण्यात आली आहे.

शासनाने किरकोळ विक्री करणाऱ्या सर्व औषध दुकानदारांनी याच दराने मास्क विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांना हे दर दिसतील असे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यातील औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनीही सर्व दुकानदारांना शासनाने ठरवून दिलेल्या दराने मास्क विक्री करण्याबाबत सूचना देत तसे दरफलकही लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. जालना जिल्हयातील किरकोळ औषधी विक्रेतेही नियमाचे पालन करत आहेत. या नवीन दराबाबत जिल्हा औषधी विभागाच्या वतीने सर्वसामान्यांना माहिती व्हावी म्हणून जिल्ह्यात जनजागृतीही करण्यात येत असून प्रशासनाच्या ठरवून दिलेल्या दराने विक्री होते की नाही याबाबत औषधी दुकानांची नियमित तपासणीही करण्यात येत आहे.

मास्कची चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई
शासनाने मास्कचे दर निश्चित केलेले असून या दराने मास्क विक्री करावी तसेच मास्कच्या दराबाबत दर्शनी भागात फलक लावावा तसेच शासकीय दरापेक्षा चढ्या भावात मास्क विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जालना औषधी विभागाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिला आहे.