अंबानींकडून 51 जोडप्यांचा थाटामाटात सामूहिक विवाह

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातर्फे शाही सामूहिक विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. रिलायन्सकडून गरीब कुटुंबातील 51 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या शाही सामूहिक सोहळय़ाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नवी मुंबई इथे पार पडलेल्या या सोहळय़ासाठी एक हजारहून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या सोहळय़ाचे फोटो, व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या भव्य विवाह सोहळय़ात 51 जोडपी विवाहबद्ध झाली. यातल्या प्रत्येक नवरीला एक सोन्याचे मंगळसत्रू भेट म्हणून देण्यात आले. इतकेच नाही तर सोन्याची अंगठी, तसेच चांदीची पैंजण आणि इतर दागिन्यांचा यात समावेश आहे. लग्न लागल्यानंतर प्रत्येक जोडप्याच्या चेहऱयावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळला. लग्नासाठी कपडे, दागिन्यांसोबत प्रत्येक जोडप्याला तब्बल एक वर्षे पुरेल इतके किराणा सामानही देण्यात आले. प्रत्येक वधूला या सोहळय़ात एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.