
अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरजवळील नाहरलगुन दैनिक बाजार येथे मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुमारे 700 दुकाने जळून खाक झाली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आगीची माहिती पहाटे चारच्या सुमारास मिळाली. ही राज्यातील सर्वात जुनी बाजारपेठ आहे आणि इटानगरपासून सुमारे 14 किमी अंतरावर नाहरलगुन येथील अग्निशमन केंद्राच्या जवळच आहे.
दिवाळी साजरी करताना फटाके लावल्यामुळे ही आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन विभागाने तत्काळ ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र दुकाने बांबू आणि लाकडाची असल्यामुळे ही आग झपाट्याने पसरली. घाबरलेल्या दुकानदारांनी आगीपासून ज्या वस्तू वाचवता येतील त्या वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले.
आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाच्या तपासानंतरच आगीचे कारण समजेल, असे पोलिस अधीक्षक जिमी चिराम यांनी सांगितले.
स्थानिक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, आगीची माहिती मिळताच ते जवळच्या अग्निशमन केंद्रात पोहोचले, मात्र तेथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले परंतु त्यांच्या वाहनात पुरेसे पाणी नव्हते, असा दावा त्यांनी केला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाणी भरण्यासाठी दूरवर जावे लागले आणि ते पहाटे 5 वाजताच माघारी परतले, तोपर्यंत मार्केटचा बहुतांश भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता.




























































