
‘मास्टरशेफ इंडिया’च्या पहिल्या सीझनची विजेत्या आणि लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरिया यांच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंकज भदौरिया यांनी सोशल मीडियावर स्तनाचा कर्करोग झाल्याची माहिती देत पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्यांचे चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
‘मास्टरशेफ इंडिया’च्या पहिल्या सीजनची विजेती पंकज भदौरिया यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. या कठीण प्रसंगात त्यांनी रुग्णालयातील बेडवरून स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. मला सध्या तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची अत्यंत गरज आहे.” असे म्हटले आहे. पंकज भदौरिया यांनी ही माहिती शेअर करताच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक नामांकित व्यक्तींनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावुक संदेशानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून, त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना आणि ‘गेट वेल सून’चे संदेश पाठवले आहेत.
पंकज भदौरिया यांनी 2010 मध्ये प्रसारित झालेल्या ‘मास्टरशेफ इंडिया’च्या पहिल्या भागात सहभाग घेतला होता. या शोचे विजेतेपद पटकावून त्या देशाच्या पहिल्या मास्टरशेफ ठरल्या आणि रातोरात स्टार बनल्या. सोशल मीडियावर पंकज भदौरियाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रचंड सक्रिय असून त्यांचे कुकिंगचे व्हिडिओ नेटीझन्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओंना 26 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.




























































