राज्यात गोवर रुग्णवाढ, 745 बाधित, 18 मुले दगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गोवर रुग्णसंख्या वाढतच असून एकूण रुग्णसंख्या 745 वर पोहोचली असून संशयित रुग्णांची संख्या 12 हजार241 वर पोहोचली आहे. तर गोवरमुळे आतापर्यंत एकूण 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यात गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत गोवंडीत गोवरचा पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, मालाड, भांडुप आदी परिसरात गोवरचा उद्रेक झाला असून राज्यात मालेगाव मनपा, भिवंडी मनपा, ठाणे मनपा, ठाणे जिल्हा, वसई – विरार मनपा, मिरा भाईंदर मनपा, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा, औरंगाबाद मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, बुलढाणा व राजगड या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. दरम्यान, मुंबई-महानगरात गोवर मुळे आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत रुग्णसंख्या 346 वर

मुंबईतही रुग्णसंख्या वाढत असून आज एकाच दिवसात 23 बाधित आढळल्याने रुग्णांची संख्या 346 वर पोहोचली आहे. तर 83 संशयित आढळल्याने संशयितांचा आकडा 4355 झाला आहे. मुंबईत आज 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 डॉक्टरांचा टास्क फोर्स

गोवरचा संसर्ग हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने अखेर 11 तज्ञ डॉक्टरांचा राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला आहे. राज्याचे माजी  आरोग्य  महासंचालक डॉ.  सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली  हा 11 सदस्यीय टास्क फोर्स  काम करणार आहे.

मागील काही  दिवसांपासून राज्यात गोवरचा प्रादुर्भाव  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात मुंबईत गोवरचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून आले त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, अकोला, ठाणे,  भिवंडी व वसई  विरार, रायगड, मालेगाव,  संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड, बुलढाणा  या  जिह्यातही गोवरचे रुग्ण सापडले  आहेत.

आतापर्यंत राज्यात गोवरने 18 मुलांचा बळी घेतला आहे. तर राज्यात आतापर्यंत 12 हजार 241 गोवरचे संशयित रुग्ण   आढळले  आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याच्या आरोग्य विभागाने गोवर प्रतिबंधक उपाययोजना टास्क फोर्स स्थापन केला आहे.

टास्क फोर्सचे सदस्य

बाल रोग तज्ञ डॉ. आरती किणीकर व डॉ. प्रमोद जोग, आरोग्य सेवेचे माजी संचालक पी.एस. डोके, संचालक डॉ. अब्राहम, साथरोग सहाय्यक संचालक डॉ. प्रदिप आवटे, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके, ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. मंगेश पाटे, डॉ. यशवंत आमडेकर व डॉ. नितीन आंबाडेकर