गोवर घटला; 81लसीकरण केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवर आता मात्र पूर्ण नियंत्रणात आला आहे. त्यामुळे पालिकेने हेल्थ पोस्टवर सुरू केलेली 81 गोवर प्रतिबंधक लसीकरण केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असल्याची माहिती आज अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात येत असताना ऑक्टोबर महिन्यापासून गोवरचा झपाटय़ाने फैलाव झाला. मुंबईत गोवरबाधित रुग्णांची संख्या 565 वर पोहोचली होती.

विशेष म्हणजे गोवरने मुंबई आणि महानगर परिसरात आतापर्यंत 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईभरात पालिकेच्या आरोग्य केंद्रांवर 81 ठिकाणी गोवर प्रतिबंधक लसीकरण सुरू केले होते. शिवाय घरोघरी सर्वेक्षण करून जनजागृतीही करण्यात आली, मात्र सद्यस्थितीत लसीकरण पूर्ण होत आल्याने आणि रुग्णसंख्याही घटल्याने टप्प्याटप्प्याने ही लसीकरण केंद्रे बंद करण्यात येतील. दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात गोवरचे 2 रुग्ण आढळले,  तर 15 संशयित रुग्ण आढळले आहेत.