
देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणाऱ्या महाशिवरात्री यात्रोत्सवाकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 18 जानेवारीच्या बैठकीत संबंधित विभागांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची पूर्तता होत आली आहे.
देवस्थान ट्रस्टमार्फतही आवश्यक त्या सोयीसुविधांबरोबर 200 स्वयंसेवक ट्रस्टमार्फत कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी कुणकेश्वर भक्तनिवास येथे आयोजित केलेल्या बैठकीत दिली. श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव नियोजन आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला देवगड तहसीलदार स्वाती देसाई, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, कोषाध्यक्ष अभय पेडणेकर, सरपंच गोविंद घाडी, आण्णा वाळके, अजय नाणेरकर, संजय आचरेकर, अन्य सदस्य व्यवस्थापक रामदास तेजम उपस्थित होते.
या यात्रा नियोजन आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची दुरुस्ती अथवा अन्य प्रस्ताव देऊन मंजुरी प्राप्त होऊनही निधीची उपलब्धता होत नाही. स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीत ग्रामपंचायत नियोजन, पाणी सुविधा दुकान रचना, स्वछता गृह, दुकान गाळे, पार्किंग, पाणी शुद्धीकरण या कामांचा आढावा ग्रासेवक गुणवंत पाटील यांनी दिला. तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र राठोड यांनी आरोग्य पथक, उपचार केंद्र, अँब्युलन्स याबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हा परिषद उपअभियंता महाले यांनी रस्त्यातील खड्डे, रस्त्यांची कामे, झाडी तोडणे ही कामे सुरू असल्याची महिती दिली तसेच रस्त्यांची इतर आवश्यक कामे सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी बासूदकर यांनी सांगितले. या बैठकीत मराविवी कंपनी उपविभागीय अधिकारी शेख यांनी दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन ट्रान्सफार्मर बसवून दोन शिफ्टमध्ये 30 कर्मचारी तैनात केले आहेत. तात्पुरते 100 वीजजोडण्या देण्यात येणार आहे. बीएसएनएलचे उपविभागीय अधिकारी कैलास पायमोडे यांनी 5 कर्मचारी तैनात केले असून मोबाईल सुविधेसह फायबर लँडलाईन कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.
रापम देवगड आगारामार्फत 30 प्रवासी फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असल्याचे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली. मत्स्य व्यवसाय विभागामार्फत एक गस्ती नौका ,पेट्रोलिंग, त्याचबरोबर फायबर पात, सागर सुरक्षा रक्षक, तैनात करण्यात येणार असल्याचे मालवणकर यांनी सांगितले. पोलीस प्रशासनमार्फत नियोजनाची पुरेशी माहिती प्राप्त न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अग्निशमन यंत्रणा, पाणी टँकर, जीवरक्षक यांचा आढावा घेण्यात आला. देवस्थान ट्रस्टमार्फत दर्शन मंडप, दर्शन रांगा, स्वयंसेवक देवस्वारी व्हीआयपी दर्शन, पास, स्वागत कक्ष, जनरेटर, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस नियंत्रण कक्ष सुविधा याबाबत अध्यक्ष संतोष लब्दे यांनी माहिती दिली.
























































