पे अ‍ॅण्ड पार्कला येथील व्यापार्‍यांनी केला विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने कापड बाजारामध्ये पे अ‍ॅण्ड पार्क उभा करण्याचा निर्णय घेतला याला व्यापारी असोसिएशनने तीव्र विरोध केला असून त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देवून आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. अतिक्रमणे व नो व्हॉगरझोनची प्रभावी अंमलबावणी करावी, अशी मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शाम देडगांवकर व सचिव व्होरा यांनी या संदर्भात आज निवेदन दिले आहे.

महानगरपालिकेने एमजी रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे. त्याला व्यापाऱ्यांनी हरकत घेतली आहे. एमजी रोडवरील व्यापारी व दुकानदारांनी कोणताही मोबदला न घेता रस्त्याच्या दोन्ही बाजुला जागा सोडून दिली होती. त्यामुळेच रस्ता रुंदीकरण झाले होते. त्यामुळे व्यापारी व दुकानदारांनी विना मोबदला दिलेल्या जागेच्या बदल्यात आमच्या ग्राहकांकडून रक्कम वसूल करणे अयोग्य आहे. पे अ‍ॅण्ड पार्कमुळे बाजारपेठेतील ग्राहक संख्या कमी होईल आणि ते उपनगरात व तालुका ठिकाणी वर्ग होतील. नोटबंदी, जीएसटी प्रकारामुळे बाजारपेठेवर तसेच व्यापार्‍यांवर मोठा परिणाम झालेला असून व्यवसायामध्ये ५० टक्के घट झाली आहे. महापालिकेला व्यापारी घरपट्टी, जीएसटी आदी कर रुपाने उत्पन्न देत आहे. यापूर्वी एलबीटी व जकातीपोटी मोठे उत्पन्न मिळत होते.