कोल्हापूरात पावसाचा जोर किंचित ओसरला, पुढील तीन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीने धाकधूक वाढली होती. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर किंचित कमी झाला असून, काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. ‘रेड अलर्ट’नंतर आता पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

धरणक्षेत्रासह सर्वत्र पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने 39 फूट इशारापातळीकडे वाटचाल करणाऱया पंचगंगेच्या पातळीत 24 तासांत सव्वा फुटाची घट झाली आहे. दुपारी चारच्या सुमारास पाणीपातळी 31 फूट झाली होती. पंचगंगेसह बहुतांशी सर्वच नद्यांचे पाणी अजूनही पात्राबाहेरच असून, शिरोळ, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके अजूनही तैनात करण्यात आली आहेत. अजूनही 27 बंधारे पाण्याखाली राहिले आहेत.

जिह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 86.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर हातकणंगलेमध्ये 3.8, शिरोळ 3.4, पन्हाळा 18.8, शाहूवाडी 26.6, राधानगरी 28.4, करवीर 11, कागल 12.5, गडहिंग्लज 9.7, भुदरगड 41.5, आजरा 25 आणि चंदगड तालुक्यात 33.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

धरणातील पाणीसाठा व विसर्ग

घटप्रभा, कोदेनंतर जांबरे हे दीड टीएमसी क्षमतेचे धरणही 100 टक्के भरले आहे. तर, राधानगरीसह प्रमुख धरणे 44 ते 60 टक्के भरली आहेत.  राधानगरी 44.14, तुळशी 46.15, वारणा 43.14, दूधगंगा 36.59, कासारी  54.01, कडवी 42.32, कुंभी 50.87, पाटगाव 47.02, चिकोत्रा 47.48, चित्री 38.73, जंगमहट्टी 47.67, आंबेआहोळ 59.38 टक्के असा जिह्यातील प्रमुख मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा झाला आहे. तर, राधानगरी 1300, वारणा 710, दूधगंगा 700, कासारी 250, कडवी 120, कुंभी 300, घटप्रभा 450आणि जांबरेतून 800 क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी चारच्या अहवालानुसार पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 31, सुर्वे 30, रुई 60, इचलकरंजी 56.3, तेरवाड 49.6, शिरोळ 39.2 आणि नृसिंहवाडी बंधाऱयाची पातळी 35.6 फूट होती.

…तर संबंधित विभागाचे प्रमुख काय करतात? – सतेज पाटील

बैठकीतील सूचना लिहून घेऊनसुद्धा त्यावर अंमलबजावणी होत नसेल, तर संबंधित विभागाचे प्रमुख करतात काय? यापूर्वी आलेल्या महापुरात दिलेल्या काही सूचनांचीही अंमलबजावणी झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने आमदार सतेज पाटील यांनी आज नाराजी व्यक्त केली. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ‘एसओपी’ तयार करावी. पूरकाळात पाणीपुरवठा करण्यासाठी एकाच वेळी किमान 10 टँकर भरतील अशी ठिकाणे निवडण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला आमदार जयश्री जाधव, मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे,  माजी महापौर निलोफर आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपशहर अभियंता हर्षदीप घाटगे, लेखापाल संजय सरनाईक, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.