
ट्विटर, अॅमेझॉननंतर आता मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांवरही कपातीचे संकट ओढावले आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्प 5 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या 11 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्ट आपल्या कंपनीतून जवळ 11 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. ब्रिटनच्या ब्रॉडकास्टर स्काय न्यूजने सूत्रांचा हवाला देत सांगितले आहे की, मायक्रोसॉफ्ट कॉर्प आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत जवळपास 5 टक्के कपात करणार आहे. म्हणजे जवळपास कंपनीतील 11 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, कंपनी कपातीच्या नव्या प्रक्रियेत अभियांत्रिकी विभागाच्या संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि कमी मागणीमुळे कंपनी ही कपात करणार आहे. मायक्रोसॉफ्टने याआधी ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील 1,000 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या कपातीमुळे सॉफ्टवेअरच्या 200,000 पेक्षा जास्त कर्मचार्यांपैकी 1 टक्क्यांहून कमी प्रभावित झाले. जुलैमहिन्यात कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. पण काही काळात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढही करण्यात आली होती. 30 जूनपर्यंत कंपनीकडे 2 लाख 21 हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करणारे होते. यापैकी 1 लाख 22 हजार कर्मचारी अमेरीका आणि 99 हजार आतंरराष्ट्रीय स्तरावर काम करत होते.






























































