पेट्रोल 111 रुपयांवर, ऑफिसला जाण्या-येण्याचा खर्च परवडेना; नोकरदारांची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. त्यातून देशात इंधन दरवाढीचे चक्र सुरू झाले आहे. पेट्रोलच्या दरात 15 मेपासून चार वेळा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आता प्रतिलिटर 111 रुपयांवर गेल्यामुळे नोकरदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नोकरदारांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘वर्क फ्रॉम होम’साठी साकडे घातले आहे.

देशभरात 15 मेपासून अकरा दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 7.38 रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटिर 7.48 रुपये वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर 111 रुपये तर डिझेलच्या दराने प्रतिलिटर 98 रुपयांची पातळी ओलांडली आहे. इंधन दरवाढीने महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल महागल्याने कार्यालयात रोज जाण्या-येण्याचा खर्चही वाढला आहे. यामुळे नोकरदारांना महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना कसरत करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटना ‘नॅसंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट’ने (नाइट्स) म्हटले आहे की, जागतिक पातळीवर ऊर्जा बाजारपेठेत मोठी उलथापालथ घडत आहे. यामुळे दररोजचा प्रवास ही आता महागडी चेन बनू लागली आहे. इंधनटंचाई आणि देशातील परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी सरकारने तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घ्यावा. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे उत्पादकतेत कोणतीही घट होत नाही हे आधीही दिसून आले आहे.