
सामना ऑनलाईन, गंगाखेड
शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान अपहरणकर्त्यास न्यायालयाने बुधवार, १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील सोळा वर्षाच्या मुलीचे २ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तिच्या राहत्या घरून अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच दिवशी संध्याकाळी अज्ञात अपहरणकर्त्या विरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान अपहृत १६ वर्षीय मुलगी जळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोउपनि भाऊसाहेब मगरे, पोलीस नायक निलेश जाधव, जमादार साहेब मानेबोईनवाड, मपोशि मनिषा केंद्रे, मपोशि मिरा पवार यांच्या पथकाने जळगाव येथे अपहृत मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
यानंतर अपहारणकर्त्याने मुलीस उत्तर प्रदेशात नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेंव्हा पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश राज्यातील संत कबीर जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहोली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीस अधिकार्यांच्या सहकार्याने पोउपनि भाऊसाहेब मगरे व त्यांच्या पथकाने शुक्रवार, १३ जुलै रोजी कुडिया या गावातुन अपहृत मुलीस ताब्यात घेतले. तसेच तिला फूस लावून पळवुन नेणार्या यशवंत चौधरी यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी चौधरी यास पोलिसांनी रविवार, गंगाखेड पोलीस ठाण्यात आणले. मुलीची वैद्यकीय तपासणी करून अपहरणाच्या गुन्ह्यात ३७६ बाल लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलमांतर्गत आरोपी चौधरी यास अप्पर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस बुधवार, १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

























































