आदिवासी पाड्यांना तातडीने वीज पुरवा! आमशा पाडवी यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील आदिवासी भागांमध्ये आजही वीज पोहोचलेली नाही आणि सरकार तेथील शेकडो शाळा बंद करायला निघाली आहे. वीजच नाही तर विद्यार्थी अभ्यास कसा करणार? आदिवासी भागांना तातडीने वीज पुरवा, अशी मागणी शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी आज विधान परिषदेत केली. धडगाव अक्कलकुवा या आदिवासी भागातील 122 शाळा बंद करण्याचे शासनाने ठरवले आहे. प्रत्येक गावाला वीज पुरवू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. डिजिटल शाळा सुरू केल्या जात आहेत, पण आजही धडगाव अक्कलकुवातील 212 गावांमध्ये वीज नाही. चांगले रस्ते नाहीत. त्यात शासनाने शाळा बंद केल्या तर विद्यार्थी जाणार कुठे? तेथील शाळा बंद करू नका. तसेच वीज नाही त्या गावांना तातडीने वीज पुरवा, नाहीतर आदिवासी विद्यार्थी डिजिटल शिक्षण कसे घेणार, असा मुद्दा आमशा पाडवी यांनी मांडला. त्यावर शिक्षणमंत्री केसरकर यांनी यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.