नगरमधील मॉलमध्ये घुसले अतिरेकी, मॉकड्रिल असल्याचे कळल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

वेळ संध्याकाळची… नगरमधील बिग बझारमध्ये अतिरेकी घुसल्याचा फोन… पोलिसांसह सर्वच यंत्रणांची धावपळ… पोलीस मॉलमध्ये घुसतात… अतिरेक्यांचा खात्मा करतात… स्फोटके निकामी करतात… ही सर्व धावपळ पाहून नगरकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. शहरावर अतिरेकी हल्ला झाल्याची चर्चा वार्‍याच्या वेगाने पसरली. मात्र, थोड्या वेळाने हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या कार्यक्रम आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात काही विपरित घटना घडली, तर यंत्रणा किती सक्षम आणि जागरूक आहे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सावेडी येथील बिग बझारमध्ये अतिरेकी घुसले असून, त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आणि काही वेळातच बिग बझार परिसराला छावणीचे स्वरूप आले. पोलिसांनी बिग बझारमध्ये घुसून तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. शहरात पहिल्यादांच असा प्रकार घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले होते. यानंतर पोलिसांनी आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांसाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे सांगितल्यानंतर गोंधळलेल्या नगरकरांच्या जिवात जीव आला.