
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
तुम्ही (मोदी) केवळ ‘नेहरू जॅकेट’ घालून जवाहर लाल नेहरू बनू शकत नाही. परदेशात दौरे करून इंदिरा गांधींसारखे बनू शकत नाही. डिजाइनर जॅकेट आणि कुर्ते घातल्याने राजीव गांधी बनू शकत नाही, असा टोला काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तसेच ‘या नेत्यांच्या रांगेत विराजमान होण्यासाठी तुम्ही त्यांच्यासारखा त्याग केला पाहिजे. असा त्याग करण्याचं धाडस तुमच्यात आहे का?’, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शनिवारी गुजरातमधील साबरकांठा येथे एका सभेला संबोधित करताना अहमद पटेल यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. 2014च्या लोकसभा निवडणुकी आधी नरेंद्र मोदींनी जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्यात ते अयशस्वी राहिले आहेत. खोटी वचनं, खोटी माहिती पसरवून तुम्ही सत्तेत आलात. पण चार वर्षांतच आपण लोकांच्या मनातून एवढे उतरू असा विचार देखील तुम्ही केला नसेल. लोकांचा आता भाजपच्या मोहजालातून बाहेर आले आहेत. त्यामुळेच तीन राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
2014 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता आपल्याला कुणीच पराभूत करू शकणार नाही, असं तुम्हाला वाटलं. पण तो तुमचा अहंकार होता. तुमच्या हे लक्षातल आलं नाही की ज्या जनतेनं तुम्हाला सत्तेत आणलं तेच तुम्हाला हकलवूनपण देतील, असंही पटेल म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी तिहेरी तलाकचे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही, असे ठाम मत मांडले आहे. सर्व विरोधीपक्षांना सोबत घेऊन या विधेयकाचा विरोध करू असं त्यांनी म्हटले आहे.




























































