
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. या टिकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.
मोदी सरकार पहिल्यांदा केंद्रातील सत्तेत आलं त्यानंतर एकदा बारामतीत बोलताना शरद पवार आपले गुरु असल्याचं मोदींनी सांगितलं होतं. आता त्याच मोदींनी पवारांवर निशाणा साधलाय. कृषीमंत्री असताना महाराष्ट्रातील नेत्यानं शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. यासोबत, 2014 सालाच्या आधी फक्त भ्रष्टाचाराचे आकडे यायचे, असंही मोदी म्हणाले. मोदींच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आठवण करून दिली की, ‘आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल की याच मोदी सरकारनं शरद पवार यांना त्यांच्या शेती आणि विकासाच्या कार्याबद्दल पद्मविभूषण दिलं आहे’.
त्याच बरोबर, ‘टीका टिपण्णी उतना तो हक बनता है. की पंतप्रधान राज्यात आल्यानंतर कुणावर टीका करणार? अर्थातच शरद पवारांवर त्याच्यामुळे ठीक आहे. त्यांच स्वागत आहे. त्यांनी महाराष्ट्रात जरूर यावं, शरद पवार यांच्यावर टीका करावी. कारण आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतं आहे’, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
























































