लहान मुलांना गुप्तांगाविषयी विचारणं चुकीचं, मोहन भागवत यांची डाव्या विचारसरणीवर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढत असल्याचं म्हणत टीका केली आहे. पुणे येथे जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

मोहन भागवत यांनी यावेळी डाव्या विचारसरणीवर टीका केली. ते म्हणाले की, मी गुजरातमधील एका शाळेत गेलो होतो, तिथे मला एका व्यक्तिने बालवाडी विभागाचा एक आदेश दाखवला. त्यात शिक्षकांना बालवाडीच्या मुलांना आपल्या गुप्तांगाचं नाव माहीत आहे का, याचा शोध घेण्यास सांगितलं होतं. हा डाव्या विचारसरणीचा शैक्षणिक यंत्रणेवरचा हल्ला आहे. आपल्या संस्कृतीच्या सर्व पवित्र गोष्टींवर अशा प्रकारे हल्ला केला जात आहे, असं भागवत यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेत ट्रम्प यांच्या सरकारनंतर जेव्हा नवीन सरकार बनलं होतं, तेव्हा त्यांचा पहिला आदेश शाळेसंबंधी होता. त्यात सांगितलं गेलं होतं की विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या लिंगाविषयी बोलू नका. विद्यार्थ्यांना हा निर्णय घेण्याइतपत सक्षम असायला हवं. जर एखाद्या मुलाला वाटतंय की तो मुलगी आहे, तर त्याला मुलींसाठी असलेली स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी असायला हवी, असं भागवत यावेळी म्हणाले.

डाव्या विचारसरणीचे लोक अहंकारी असतात आणि त्यांना त्यांच्या अहंकारावर तसंच दुष्ट प्रवृत्तीचा अभिमानही असतो. त्यांच्याकडे लोकांचं समर्थन नाही आणि त्यांच्याकडे आर्थिक ताकद असेल, पण आता त्यांचे विचार पसरत चालले आहेत. आपण इथे कमी पडत आहोत. आपल्या जगाविषयी जो गैरसमज पसरवण्यात आला आहे, तो दूर करण्याची गरज आहे, असंही भागवत यावेळी म्हणाले.