
अत्यंत तीव्र उन्हाचे चटके, भयंकर तापमानवाढ आणि त्यातून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला असून सुधारित अंदाजानुसार 1 जून रोजी मान्सून केरळात धडकेल. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची एण्ट्री उशिराने होणार असून पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
कमकुवत वारे व प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे केरळममध्ये मान्सूनच्या आगमनाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. अंदमानच्या समुद्रापर्यंतचा मान्सूनचा मार्ग विनाअडथळा होता. त्यानुसार पुढील वाटचालही निर्विघ्नपणे सुरू राहून मान्सून यंदा लवकर म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीसच केरळममध्ये दाखल होईल, असे भाकीत हवामान शास्त्रज्ञांनी केले होते. हवामान खात्याने 26 मे रोजी केरळममध्ये मान्सून हजेरी लावेल, असे म्हटले होते. मात्र मंगळवारी तो मुहूर्त हुकला. हवामान खात्याच्या अंदाजासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 10 मेनंतर केरळम आणि लगतच्या भागांतील 14 निरीक्षण केंद्रांपैकी किमान 60 टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस 2.5 मि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते. तसेच पश्चिमेकडील वाऱ्यांचा आवश्यक वेग कायम राहणे आणि ढगाळ वातावरण असणे गरजेचे असते. ही अनुकूल परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे मान्सूनचा केरळममध्ये दाखल होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
मागील आठवडाभर मुंबईकर तापमानवाढीचे तीव्र चटके सहन करत आहेत. पुढचे दोन दिवस पारा 35 अंशांवर राहील, असा अंदाज वर्तवतानाच हवामान खात्याने बुधवारी दुपार ते सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी शहराच्या अनेक भागांत 35 ते 38 अंशांपर्यंत तापमान नोंद झाले.
चक्राकार वाऱ्यांमुळे मान्सूनचा वेग मंदावला
मान्सूनच्या वेगवान वाटचालीमध्ये चक्राकार वाऱ्यांनी ‘खो’ घातल्याचे स्पष्ट होत आहे. दक्षिण-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आर्द्रता त्या भागाकडे खेचली जात आहे. त्यामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून पुढील चार दिवसांत तो केरळममध्ये दाखल होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.






























































