जेवढी जास्त मुलं तेवढा जास्त पगार ! सिक्कीम सरकारची अनोखी घोषणा  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील प्रजनन दर सुधारण्यासाठी सिक्कीम सरकारने केलेल्या अनोख्या घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राज्य सरकारने एक प्रस्ताव केला आहे. त्यानुसार, महिला कर्मचारी दुसऱयांदा आई झाल्यावर वेतनवाढ तर तिसऱयांदा आई झाल्यावर दुप्पट वेतनवाढ मिळणार आहे. एवढेच नव्हे तर ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून आई बनणाऱयांना तीन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

सिक्कीममधील प्रजनन दर कमी झाला आहे. यात प्रति स्त्री एक बालक असा सर्वात कमी वाढीचा दर नोंदवला गेला आहे. वांशिक समुदायांची लोकसंख्यादेखील कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जातीय समुदायातील लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्याचा प्रजनन दर सुधारण्यासाठी आपण महिला आणि स्थानिकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.’ सरकारने राज्यातील रुग्णालयांमध्येही आयव्हीएफ सुविधा सुरू केली आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे माता झालेल्यांना तीन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. राज्यात आतापर्यंत 38 महिला ‘आयव्हीएफ’द्वारे गर्भवती झाल्या आहेत, त्यापैकी काहींनी मुलांना जन्मही दिला आहे.