
सामना ऑनलाईन । मुंबई
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई उपनगर जिह्यात आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 8 हजार 465 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आलेले आहेत. खासगी मालमत्तेवरील 2226 असे एकूण 10 हजार 691 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.
आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथक, स्टॅटिक सरव्हायलन्स टीम, व्हिडीओ सरव्हायलन्स टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात आल्या आहेत. नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत उपनगर जिह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे. उपनगर जिह्यात 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या जिह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यात 26 विधानसभा मतदारसंघ अंतर्भूत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविली आहे.





























































