
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विविधता आणि एकतेमुळे समृद्ध असलेल्या हिंदुस्थानात भाषांची समृद्धताही मोठय़ा प्रमाणात आहे. रजिस्टार जनरल ऍण्ड सेन्सस कमिशनर यांनी गोळा केलेल्या माहितीत हिंदुस्थानात १९ हजार ५०० हून जास्त मातृभाषा बोलल्या जातात तर देशभरात १२१ भाषा बोलल्या जातात, असे समोर आले आहे. हिंदुस्थानात ९६.७१ टक्के लोक अधिकृतपणे मान्यता असलेल्या २२ भाषांचा वापर करतात. २०११मध्ये केलेल्या या अहवालातून देशभरात १९ हजार ५६९ मातृभाषा असल्याचे आढळले.
भाषिक छाननी, संपादन आणि सूसूत्रता या मधून देशभरात १९ हजार ५६९ मातृभाषांची नोंद झाली. यात १ हजार ३६९ या व्याकरणिकदृष्टय़ा योग्य तर १ हजार ४७४ भाषा या व्याकरणिकदृष्टय़ा विभागणी न झालेल्यांमध्ये आहे. १ हजार ३६९ भाषांमधून पुन्हा छाननी करून १२१ भाषांची सूसूत्र अशी नोंद करण्यात आली. १२१ भाषांचे दोन गट करण्यात आले आहेत. या पैकी घटनामान्य असलेल्या अधिकृत २२ भाषा तर उर्वरित घटनामान्य नसलेल्या, अधिकृत नसलेल्या ९९ भाषांचा गट मोडतो.
घटनामान्य २२ भाषा
आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, ऊर्दू, बोडो, संथाली, मैथिली, डोगरी
मातृभाषा म्हणजे काय?
ज्या भाषेतून व्यक्ती न अडखळता भावना व्यक्त करते, त्याला मातृभाषा असे म्हणतात. प्रमाणित भाषेबरोबर ती जुळेलच असे नाही. मातृभाषा आणि प्रमाणित भाषेचे मूल्यमापन करून बोलणाऱयाची भाषा ही मातृभाषा आहे की, बोलभाषा आहे, याचे भाषिक समीकरण जुळवले जाते.
एकाच घरात अनेक भाषा
देशभरातून गोळा केलेल्या माहितीत एकाच घरात अनेकांची मातृभाषा ही वेगवेगळी आढळली. एकाच घरात असलेल्या सगळय़ांची मातृभाषा सारखीच नव्हती. काही घरांमध्ये सारखी तर काही घरांमध्ये ती वेगवेगळी आढळली. काही वेळा एकाच घरात राहणारी माणसे ही सख्खी भावंडे किंवा एकाच कुटुंबातील नव्हती. त्यामुळे प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळी होती.




























































