बीड जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक, दिवसभरात आढळले एक हजारहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दिवसभरामध्ये तब्बल 1062 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना मृत्युचा आकडाही वाढू लागला आहे.

बीड जिल्ह्यातील 5689 रूग्णांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात 4619 रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 1062 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यात सर्वाधिक अंबाजोगाईमध्ये 223 रुग्ण आढळले आहेत. तर  आष्टी 193, बीड 220, धारूर 30, गेवराई 64, केज 106, माजलगाव 34, परळी 75, पाटोदा 53, शिरूर 45, वडवणी 19 रुग्ण आढळले आहेत.

अंबाजोगाईत 48 तासात 16 जणांचा मृत्यू

अंबाजोगाईमध्ये कोरोनाबाधित उपचार घेत असलेल्या रूग्णालयामध्ये मृत्युचा आकडा वाढू लागला आहे. गेल्या 48 तासात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सात जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर रविवारी सहा  जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तीन जणांचे अंत्यसंस्कार वेटिंगवर आहेत.

अन् वेळेत ऑक्सिजन उपलब्ध झाला

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयामध्ये कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात. रूग्णांची संख्या प्रचंड असल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. लातूर येंथून अंबाजोगाईला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले जाते. लातूर येथे ऑक्सिजनसाठीही वेटिंग आहे. एकीकडे उपचार घेत असलेल्या रूग्णांना ऑक्सिजन मिळतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध झाला आणि यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.