Movie Review – छोटीशी आंबटगोड गोष्ट – आपडी थापडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी पाटकर – फडके 

आपडी-थापडी, गुळाची पापडी.. हा खेळ कुणाकुणाला आठवतोय? लहान असताना आपल्यापैकी अनेक जण हा खेळ नक्की खेळला असणार. आज आपल्या विस्मरणात गेलेला हा खेळ आणि त्याच्याशी निगडीत अनेक आंबटगोड आठवणी आपल्या मनात आजही रुंजी घालत असतील. याच खेळाच्या नावावर एक आंबटगोड गोष्ट घेऊन आलेला आपडीथापडी हा चित्रपटही तसाच आहे.

हा चित्रपट एका मुलीची आणि एका करडूच्या मैत्रीची गोष्ट सांगतो. एका गावात राहणारा सखाराम पाटील (श्रेयस तळपदे) हा अतिशय कद्रू पण हुशार शेतकरी, त्याची बायको पार्वती (मुक्ता बर्वे), मुलगी तुळशी (खुशी हजारे) आणि घरातच राहणारा मित्र संदीप पाठक (दामू) यांच्या भोवती ही कथा गुंफली आहे. या शेतकऱ्याच्या घरातील बकरी एका छानशा करडाला जन्म देते. पांढऱ्याशुभ्र रंगाचं ते करडू तुळशीचा जीव की प्राण होतं. ती त्याचं नाव पिंकू ठेवते. सखारामच्या कद्रूपणामुळे पार्वती आणि दामू त्याला वैतागलेले असतात. पण, तरीही सगळं सुरळीत सुरू असतं. एक दिवसं पिंकू आजारी पडतं आणि त्याच्यावर इलाज करण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार असतात. तिथेच नेमकं सखारामचं घोडं अडतं. मग पैसे वाचवण्यासाठी तो जे उद्योग करतो, त्यात स्वतःच गुंतत जातो आणि त्या गडबडीत पिंकू आणि त्याची ताटातूट होते. मग, पुढे काय होतं? पिंकू त्याला सापडतं का, त्याच्यावर इलाज होतो का, सखाराम बदलतो का याची कथा चित्रपटात पाहावी लागेल.

चित्रपटाच्या कथेच्या बाबत बोलायचं झालं तर ही एक हलकीफुलकी बालकथा आहे. पटकथेच्या पार्श्वभूमीत, काळात आणि तपशीलात बऱ्यापैकी विस्कळीतपणा आहे. पण, तरीही चित्रपटाची कथा बांधून ठेवते. हळूहळू गमतीदार प्रसंग घडून कथा पुढे सरकत राहते. चित्रपटाचा वेग थोडा मंद आहे. त्यामुळे कधी कधी कंटाळवाणं वाटू शकतं. दिग्दर्शन आणि संकलनात चित्रपट उत्तम आहे. छाया दिग्दर्शनही अतिशय सुंदर असून फ्रेम्स सुंदर घेण्यात आल्या आहेत. चित्रपटाचं संगीतही उत्तम आहे.

तीच बाब अभिनयाची. अभिनेता श्रेयस तळपदे खूप काळाने मोठ्या पडद्यावर झळकला आहे. त्याने सखाराम पाटील उत्तम रंगवला आहे. फक्त अध्येमध्ये त्याच्या शहरीपणाची झाक डोकावते. मुक्ता बर्वे हिने नेहमीप्रमाणे बॅटिंग करत एक उत्तम गृहिणी आणि आई साकारली आहे. त्यांना संदीप पाठक, नंदू माधव आणि नवीन प्रभाकर यांची दमदार साथ मिळाली आहे. लहानग्या खुशी हजारे हिचाही अभिनय लक्षात राहतो. एकंदरच हा चित्रपट खूप काही मोठी गोष्ट सांगत नसला तरी अत्यंत लोभसवाणा झाला आहे. एक छोटी हलकीफुलकी आंबटगोड गोष्ट सांगणारा चित्रपट बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही आवडेल असा आहे.