
सामना प्रतिनिधी । नांदेड
एकीकडे मराठा समाजाला राज्यात आरक्षण द्यायचे आणि केंद्रात सवर्णांना दहा टक्के आरक्षण द्यायचे याची अंमलबजावणी होणे शक्य नसल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आणखी एक चुनावी जुमला असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केला.
आयटीएम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खा. अशोक चव्हाण बोलत होते. गेली चार वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार अशा घोषणा करुन महाराष्ट्रातील जनतेला झुलवत ठेवले. त्यासंदर्भातील वेगवेगळ्या घोषणाही निवडणुकीत वापरण्यात आल्या, मात्र तीनवेळा याचे भूमिपुजन, जलपूजन होवून सुध्दा या कामाला प्रारंभही झाला नाही. त्यामुळे शुध्द जनतेची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला.
नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पातंर्गत ६० कोटी रुपयांचा निधी अद्याप अखर्चिक आहे. हा निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिने अवधी असताना याचे प्रस्ताव तयार होतील केंव्हा, त्याची मंजुरी मिळेल केंव्हा हा सगळा प्रश्न असून, याबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली. दुष्काळाची परिस्थिती, पाण्याचा प्रश्न आदीबाबतच्या नियोजनाबद्दल देखील प्रशासन संथगतीने काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नांदेड जिल्ह्यात जवळपास दिडशेहून अधिक ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत आहेत. यासाठी निधीची कमतरता नसताना हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करुन येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा हा एकमेव पक्ष आहे. ज्यांच्याशी आमची सरळ टक्कर होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात आम्ही युती करण्यासंदर्भात सकारात्मक आहोत, याबद्दल चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. निश्चितच प्रकाश आंबेडकर खासदार व्हावेत, हे आमची मनोमन इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजीमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.अमर राजूरकर, आ.वसंत चव्हाण, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, संजय बेळगे, बापूराव गजभारे आदी उपस्थित होते.





























































