
>> प्रसाद नायगावकर
अवैध्यरित्या हातभट्टी दारूचे गाळप करून विक्री करणाऱ्या कुख्यात आरोपी विरुद्ध एमपीडीए ची कारवाई करण्यात आली आहे . यवतमाळ जिल्ह्यातील इतिहासातील ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल . राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला . जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करताच आरोपीला बेड्या ठोकून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे .
अमर राजू दातार असे एमपीडीएअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीचा अवैध हातभट्टी दारू गाळप करून विक्री करण्याचा गेल्या अनेक वर्षापासून करीत होता . गुन्हेगारीचा त्याचा अगदी पूर्वीपासून अभिलेख आहे. यापूर्वी त्याचा हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त करून गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. मात्र, हातभट्टी दारू गाळप करून विक्री करणे सुरूच होते. मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या वाढत्या हातभट्टी दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या वतीने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे एमपीडीए प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी डॉ. पकंज आशिया यांनी आदेश पारीत करताच अमर दातार याला अकोला कारागृहात स्थानबद्घ करण्यात आले.
काय आहे एमपीडीए कायदा?
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.
अवैध दारू गाळप करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येते . पण कायद्याच्या पळवाटा शोधून या आरोपींची लवकरच जमानत होते आणि ते तुरुंगाबाहेर येतात . आणि ते पुन्हा आपला अवैध व्यवसाय सुरु करतात . एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्याने कुठेतरी या असल्या गुन्हेगारांना जरब बसेल असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांनी व्यक्त केला .
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक निरीक्षक संतोष भटकर, दुय्यम निरीक्षक सी. टी. दरोडे,पी. आर. बाभूळकर,, ए.बी. पेंदोर, पी. जी. मसराम, एम.पी. शेंडे, ए. आर. बोथले, धर्मेंद्र त्रिपाठी, डी. ओ. कुटेमाटे, अजीज पठाण, संदीप दुधे, महेश खोब्रागडे, चिद्दरवार आदींनी केली.






























































