राज्यातील वीज मीटरची वानवा संपणार, महावितरणकडे मार्चअखेर पाच लाख मीटर उपलब्ध होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून महावितरणकडे निर्माण झालेली वीज मीटरची वानवा आता संपणार आहे. महावितरणने नुकतेच तब्बल 20 लाख वीज मीटरच्या खरेदीसाठी निविदा काढल्या होत्या. त्यानुसार 1 लाख 44 हजार वीज मीटर उपलब्ध झाले असून पुढील आठ दिवसांत आणखी 3 लाख 80 हजार मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महावितरणसह राज्यभरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महावितरणकडून दरवर्षी जवळपास 8 ते 9 लाख नवीन वीज जोडण्या दिल्या जातात. सदर वीज जोडणी देताना संबंधित ग्राहकांच्या वीज वापराचे मोजमाप ठेवण्यासाठी डिजिटल वीज मीटर उपलब्ध करून दिला जातो. तसेच सरासरी दोन-अडीच लाख मीटर नादुरुस्त होतात. त्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वर्षाला 12 लाखांहून अधिक वीज मीटरची खरेदी केली जाते. मात्र कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने महावितरणला अर्ध्याहून कमी वीज मीटर उपलब्ध झाले होते.

त्यामुळे ग्राहकांना नवीन वीज जोडणी देताना, नादुरुस्त मीटर बदलताना महावितरणवर मर्यादा आल्या होत्या. त्याची दखल घेत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पुढील वर्षभरासाठी पुरतील एवढय़ा वीज मीटरचे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार 18 लाख सिंगल फेज, तर 1 लाख 70 हजार थ्री फेज मीटर खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे महावितरणला वीज मीटर उपलब्ध होऊ लागले आहेत.

संभाजीनगर विभागात सर्वात कमी मीटर

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयांकडे केवळ एक लाख 44 हजार वीज मीटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये पुणे प्रादेशिक विभागाकडे 38 हजार, कोकण विभागाकडे 69 हजार, नागपूर विभागाकडे 20 हजार तर संभाजीनगर विभागाकडे सर्वात कमी 16 हजार 500 वीज मीटर उपलब्ध आहेत.