संप फुटीच्या उंबरठय़ावर, कामगार कामावर परतू लागले; दोन हजार कर्मचारी हजर, 36 बसेस सुटल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या विविध मागण्यांसाठी गेले दोन आठवडे सुरू असलेला एसटी कर्मचाऱयांच्या संप आता फुटीच्या उंबरठय़ावर आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याने कामगारांनी कामावर परतावे असे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केल्यानंतर आज महामंडळाचे दोन हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणांहून आज एकूण 36 बसेस रवाना करण्यात आल्या आहेत.

संपामुळे आतापर्यंत 125 कोटींचे नुकसान

दरम्यान, संपाने आतापर्यंत 125 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संपाची कोंंडी फोडण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यात असलेल्या खासगी शिवशाही बस सेवेचा आधार घेतला आहे. काल पुणे, नाशिक आणि धुळे अशा बसेस सोडण्यात आल्या परंतु दोन बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तसेच गेट बंद करणे, कर्मचाऱयांना हार घालणे, अशा प्रकरणात राज्यभरात एकूण 48 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात दगडफेक प्रकरणात 7 ते 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एसटी कर्मचाऱयांनी सुरू केलेल्या संपाला दोन आठवडे उलटून गेले असून आता हळूहळू कामगार कामावर परतायला लागले आहेत. आज दोन हजार कामगार कामावर रुजू झाले असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली. कामावर परतलेल्या कामगारांमध्ये बहुतांशी यांत्रिक कामगारांचा समावेश असून कामावर परतणाऱया कामगारांना संरक्षण पुरविण्यात येणार असल्याचेही उपाध्यक्ष चन्ने यांनी म्हटले आहे.

मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी सुटली

महामंडळाने आज मुंबई सेंट्रल, दादर, पुणे, स्वारगेट,नाशिक, इस्लामपूर, सोलापूर, अक्कलकोट, राजापूर अशा भागातून 36 बसेस रवाना केल्या. मुंबई सेंट्रल आगारातून पोलीस बंदोबस्तात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई ते सातारा ही पहिली बस रवाना करण्यात आली. तसेच महामंडळाने आज खाजगी शिवशाही, शिवनेरीबरोबर साध्या बस गाडय़ांचा वापर करीत राज्यातील विविध ठिकाणाहून एकूण 36 बसेस सोडल्या, त्यातून 826 प्रवाशांनी प्रवास केल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

एसटी संपामुळे कृषी सहाय्यक लेखी परीक्षा रद्द

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी सहाय्यक (पदवीका /पदवीधर) पदे भरण्याकरीता रविवार दि.14 नोव्हेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा एसटी महामंडळाच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.   राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू असून कृषी सहाय्यक लेखी परीक्षेस संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातूनही परीक्षार्थी बसतात. बहुतांशी परीक्षार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने तसेच सद्यस्थितीत वाहतुकीची असुविधा निर्माण झाल्याने अशा परीस्थितीत कोणाताही परीक्षार्थी परीक्षा देण्यापासूनच वंचित राहू नये म्हणून ही परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आल्याचे या परीक्षेची पुढील तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

कामगारांना भावनिक आवाहन 

एसटी महामंडळाने आज कामगारांना उद्देशून एक पत्रक काढले आहे. त्या पत्रकात भावनिक आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आपली लालपरी आधीच आर्थिक संकटात आहे. संप करून तिला आणखी गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा 12 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असे असूनही गेल्या 18 महिन्यांचे वेतन महामंडळाने दिले आहे. त्यासाठी राज्य सरकारने 3549 कोटींचा निधी दिला आहे. यापुढे सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महामंडळाने दिली आहे. शासकीय कर्मचाऱयांच्या धर्तीवर महागाई भत्ता (28 टक्के) व घरभाडे भत्त्याची (8,16,24 टक्के) आपली मागणी मान्य करण्यात आली आहे. दिवाळी भेटही देण्यात आली आहे. असे असताना विलीनीकरणाच्या अचानक पुढे आलेल्या मागणीसाठी संप सुरू आहे, त्या मागणीचाही विचार सुरू आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

खोत, पडळकर कामगारांना भडकवतायत, परिवहनमंत्री अनिल परब यांचा आरोप

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे कामगारांना भडकावण्याचे काम करीत आहेत. कामगारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, महामंडळ अजून अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी. जे कामगार कामावर यायला तयार आहेत, त्यांना संरक्षण दिले जाईल असे परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी म्हटले आहे. विलीनीकरणाची मागणी एक दोन दिवसांत मार्गी लागणारी नाही, त्यांच्या इतर मागण्या ज्या आहेत, त्यावर बसून चर्चा होऊ शकते.त्यासाठीची समिती हा निर्णय घेईल असेही परब यांनी सांगितले. भाजपाच्या नेत्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दोषी आढळलो तर फाशी द्या पण कामागाराचे नुकसान करू नका, असे आवाहनही परब यांनी केले.