
मुंबईतील सिमेंट-काँक्रीटच्या रस्ते कंत्राटात खोके सरकारने केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळय़ाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पर्दाफाश केला. 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी या सरकारने 6080 कोटी रुपयांचे टेंडर काढून कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून दिल्याचे कागदोपत्री पुरावेच आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवले. राज्यातील घटनाबाह्य सरकार मुंबईकरांचा पैसा लुबाडतेय असे टीकास्त्र सोडतानाच, स्वतःला विकलंत तसे मुंबईला विकू नका… मुंबईचे एटीएम बनवू नका, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारने कशा पद्धतीने हा घोटाळा केलाय त्याची टक्केवारीसह सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ‘ऑगस्टमध्ये खोके सरकारने मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींचे टेंडर काढले होते. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ते रद्द करून नवे टेंडर काढले गेले. पाच कंपन्यांना ही कामे दिली गेली आहेत. तीसुद्धा चढय़ा दराने. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपये खर्च होतो तिथे खोके सरकार 17 ते 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. रस्त्यांच्या कंत्राटामध्ये जीएसटीचे वेगळे पैसे लावण्यात आले आहेत. मुंबईची नियोजनबद्ध लूट चालली आहे. महाराष्ट्राची लुटमार सुरू आहे.’
प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली?
‘महानगरपालिकेत स्थायी समिती, सुधार समिती, आर्थिक मंजुरी देणारी इतर कोणतीही समिती अस्तित्वात नसताना आणि महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने हजारो कोटींची ही कामे मंजूर कशी केली? महापालिकेने खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? कोणाच्या आदेशावरून मंजुरी दिली गेली, मुख्यमंत्री की विशेष मुख्यमंत्री?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
‘मुख्यमंत्र्यांनी फिल्मसिटीबद्दलही महापालिकेला 200 कोटींचे टेंडर काढण्यास सांगितले होते. पण तेव्हा महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते की, फिल्मसिटी वेगळी संस्था आहे. तरीदेखील त्या टेंडरचे काय झाले अजून माहिती नाही. मुंबई महापालिकेचा पैसा दुसऱ्या संस्थेला देऊ शकतात का,’ असा सवाल त्यांनी केला.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही
‘मुंबईत रस्त्यांची कामे करण्याचा कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 31 मे असा असतो. कारण बाकीच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाळय़ानंतर सुरू झालेली कामे पावसाळय़ाच्या आधी पूर्ण केली जातात. मात्र आता हाती घेतलेली कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण होतील का, याचा अभ्यास केला गेलेला नाही. कारण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही,’ अशी बोचरी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. टेंडरची जी खिरापत वाटण्यात आली आहे तो पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आले. मुंबईतील टेंडर हे इतर राज्यांतील टेंडरपेक्षा वेगळे असते, असेही ते म्हणाले.
गेल्या सात वर्षांत ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का झाले नाहीत?
मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे पालकमंत्री होते, नगरविकास मंत्री होते. एमएसआरडीसीचे खाते त्यांच्याकडे होते. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत? ठाणे खड्डेमुक्त का झाले नाही? नवी मुंबईतील रस्ते सिमेंटचे का झाले नाहीत? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे
खोके सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून मोगलाई सुरू आहे, असे टीकास्त्रही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सोडले. ते म्हणाले की, ‘गणपती मिरवणुकीत मिंधे गटाचे आमदार सदा सरवणकरांकडून फायरिंग करण्यात आली. आमदाराच्याच बंदुकीतून गोळी चालवण्यात आली होती. तरीदेखील आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळसारखे अनेक प्रकार राज्यात घडले, परंतु कोणावरच कारवाई झालेली नाही.’
‘याबरोबरच अनेकवेळा महापुरुषांचा अवमान करूनदेखील राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारांच्या मागून मुंबईला आणि महाराष्ट्राला लुटण्याचे प्रकार केले जात आहेत. नागपूरच्या एनआयटी घोटाळय़ाबद्दलदेखील आम्ही बोललो, पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. राजीनामाही त्यांनी दिला नाही. असा निर्लज्जपणे कारभार सुरू आहे,’ असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
…तर महापालिकेच्या एफडी मोडाव्या लागतील
महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून खोके सरकार मुंबईकरांच्या डोळय़ात धूळफेक करत आहे, असा आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 25 वर्षांपूर्वी महापालिका तोटय़ात होती. शिवसेनेने चांगले काम केल्याने ती नफ्यात आली. पालिकेचा पैसा नीट वापरून आम्ही मुंबईकरांना सोयीसुविधा दिल्या. आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते पाहता मुंबई काही वर्षांत पुन्हा तोटय़ात जाईल आणि महापालिकेच्या एफडी मोडाव्या लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
टेंडर तातडीने रद्द करा
‘मुंबईत मेट्रो रेल्वे व अन्य कामे सुरू आहेत. रस्त्याचे काम करायचे झाले तर 100 मीटरपर्यंतच वाहतूक विभागाची परवानगी मिळते. बरोबरच जमिनीखालून जाणाऱ्या 42 युटिलिटीजचाही विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत 400 किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते बनवायचे तर त्याला सहा वर्षे लागतील. खोके सरकारने तीन वर्षांची टेंडर्स एकाच वेळी काढली.’ असे सांगतानाच ही टेंडर्स तातडीने रद्द करून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नव्याने टेंडर्स काढा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. गल्लीबोळांमधील रस्ते सिमेंटचे बनवण्याची गरजच नसते. तिथे अस्फाल्टचे रस्तेही चांगले टिकतात, असेही त्यांनी नमूद केले.
हे आता बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचे सरकार बनलेय
प्रश्नांच्या ओघात पत्रकारांकडून ईडीचा उल्लेख केला गेला असता, ‘ईडी म्हणजे कोण? सीएम, डीसीएम का?’ असा मिश्किल सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ‘तुम्ही ईडी म्हणालात म्हणून विचारले, नाहीतर विद्यमान सरकार आता बिल्डर कॉन्ट्रक्टरांचे सरकार झाले आहे’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
- खोके सरकार फक्त मुंबईविरोधी नाही, तर महाराष्ट्रविरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करताहेत.
- निवडणुका आल्याने मुंबईच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. यांना मुंबईची नाही स्क्वेअर फुटांची चिंता आहे.
- स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके या धोरणावर सरकार चालले आहे.































































