
मुंबईत सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लागण असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये परिणामकारक ठरलेली ‘प्लाझ्मा थेरपी’ आता गंभीर कोरोना रुग्णांनाही जीवनदान देत असल्याचे समोर आले आहे. गंभीर रुग्णांसाठी ‘प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी’ म्हणून वापरण्यात आलेल्या या उपचार पद्धतीने पालिकेच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत दहापैकी आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱया उपाययोजनांमुळे मुंबईत आतापर्यंत 1 लाख 58 हजार 749 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 28,568 सक्रिय रुग्ण आहेत. यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांची प्रकृतीही उत्तम आहे. असे असताना कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्लाझ्मा थेरपी ही परिणामकारक उपचारपद्धती वापरण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझा केंद्र सुरू करण्यात आले असून केईएम, शीव रुग्णालयातही प्लाझ्मा संकलन केले जात आहे.
‘पोस्ट कोरोना ओपीडी’मधून प्लाझ्मा दानाचे आवाहन
- कोरोनामुक्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागल्यास त्यांच्यासाठी पालिकेच्या केईएम, नायर, शीव, सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘पोस्ट कोरोना ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी ओपीडीच्या माध्यमातून कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- या ठिकाणी कौन्सिलिंग आणि आवाहन केले जात आहे. प्लाझ्मा दान करणाऱयांना पालिकेच्या माध्यमातून प्रवासासह सर्व प्रकारची सुविधा देण्यात येत आहे. प्लाझ्मा दानामुळे दुसऱया कोरोनाबाधिताचा जीव वाचणार आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.




























































