
शिवसेना आहे म्हणून महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येत मुंबईवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे केले. शिवसेना उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत यांच्या वतीने विक्रोळी मतदारसंघातील सूर्यानगर-शाखा क्र. 120, पवई-शाखा क्र. 122 येथील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा विक्रोळीत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना अजब रसायन आहे. शिवसेनेची रचना देशातील बऱयाच पक्षांना आकर्षित करीत असते. शिवसेना तिच्या वेगळेपणामुळेच टिकून असून ती आणखीनच बहरत जाणार आहे. आपापसातील वाद आणि मतभेद निवडणुका होईपर्यंत विसरून जा आणि नव्या जोमाने कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. स्थानिक शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी यावेळी आभार व्यक्त करताना या मेळाव्यातील जोश महानगरपालिकेवर भगवा फडकवत नाही तोपर्यंत टिकवून ठेवा असे सांगत उपस्थित पदाधिकाऱयांचे आभार मानले. याप्रसंगी विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर, नगरसेवक उपेंद्र सावंत, आयोजक उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत, माजी उपविभागप्रमुख विश्वास शिंदे, चंद्रशेखर जाधव, अनंत पाताडे, विधानसभा संघटक नीलेश साळुंखे, संदीप सावंत, परम यादव, उपविभाग संघटक स्नेहल मांडे, रश्मी पहुडकर, सिद्धी जाधव, मामा मंचेकर, प्रशांत दास, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.






























































