मुंबईत रुग्णसंख्या वाढतेय, दिवसाला 25 हजार चाचण्या; वेगाने रुग्ण शोधून कार्यवाहीसाठी पालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या महिनाभरापासून वेगाने रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेने चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत दिवसाला होणाऱया 7 ते 10 हजार चाचण्यांची संख्या आठवडाभरात 20 ते 25 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे रुग्ण लवकरात लवकर शोधून उपाययोजना करता येणार असल्याने कोरोनाला रोखणे शक्य होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

मुंबईत एप्रिलमध्ये कोरोना पूर्ण आटोक्यात आला होता. दैनंदिन रुग्णसंख्या केवळ 35 इतकी खाली आली होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 1 मे रोजी 628 असणारी सक्रिय रुग्णसंख्या पाच पटींनी वाढून 1 जून रोजी 2 हजार 970 पर्यंत वाढली. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 92 पर्यंत नोंद होणारी दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट सातशेच्या घरात गेली आहे. यातच पावसाळा सुरू होत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोका असल्याने पालिकेने चाचण्या वाढवून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सद्यस्थितीत 7 ते 10 हजारांपर्यंत चाचण्या होत असताना पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

पावसाळी आजारांसाठी तयारी

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे नागरिकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे ग्रॅस्ट्रोसारख्या आजाराचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र सद्यस्थितीत वाढलेली गर्दी आणि पावसाळ्यात गॅस्ट्रोच्या आजारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे आजार रोखण्यासाठी 15 हजार बेड तैनात ठेवल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

म्हणूनच काहीसा दिलासा

मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी मृत्युदर वाढला नसल्याने काहीसा दिलासा आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुळे एकूण 19,563 मृत्यूंची नोंद झाली होती. सद्यस्थितीत दररोज शेकडो रुग्णांची भर पडत असताना महिनाभरात तीन मृत्यू नोंदवले गेले आहेत.

पालिकेची यंत्रणा सज्ज

– केईएम, शीव, नायर, कूपरसह जे.जे. रुग्णालयाची मदत
– कस्तुरबा विशेष रुग्णालयासह 16 उपनगरीय रुग्णालये
– 191 दवाखाने, 212 आरोग्य केंद्रे सज्ज

पालिकेचा कोरोना डॅशबोर्ड

मुंबईतील आतापर्यंतचे रुग्ण 1066541
कोरोनावर मात केलेले रुग्ण 1044005
कोरानामुळे झालेले मृत्यू 19566
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण 2970
लक्षणे असलेले रुग्ण 324
लक्षणे नसलेले रुग्ण 2643
अत्यवस्थ रुग्णांची संख्या 3