मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाहीच, पालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नसून चाचण्या वाढल्यामुळेच रुग्ण जास्त आढळून येत असल्याने रुग्णवाढ दिसत असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज स्पष्ट केले आहे. मुंबईत होणाऱया 7 हजार चाचण्यांचे प्रमाण आता 15 हजार झाले असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. रुग्ण वाढले तरी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा देण्यास पालिका सक्षम असल्याचेही आयुक्त म्हणाले.

मुंबईत नियंत्रणात आलेली कोरोना रुग्णसंख्या ऑगस्टअखेरपासून पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यामध्ये दररोज सरासरी 1100 नोंद होणारी रुग्णसंख्या सद्यस्थितीत सरासरी दोन हजार ते 2200 पर्यंत नोंदवली जात आहे. 23 सप्टेंबर रोजीदेखील 2163 नवीन रुग्ण तर 54 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या म्हणजे दुसरी लाट नसून चाचण्या वाढल्याने जास्त रुग्ण आढळत असल्याचे आयुक्त चहल म्हणाले. 7 हजार चाचण्या होत असताना सरासरी 1100 रुग्ण आढळत होते, मात्र आता 15 हजार म्हणजे दुपटीहून जास्त चाचण्या होऊनही सरासरी दोन हजार रुग्ण आढळून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील कोरोना मृत्युदर 2.2 टक्क्यांनी कमी होऊन 4.5 टक्क्यांवर आला आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर बॅटस्मन केवळ जास्तीत जास्त चेंडू खेळून काढण्याला महत्त्व नाही तर तो विकेट टिकवून ठेवतो याला महत्त्व असल्याचे ते म्हणाले.

जीम, रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी चर्चा सुरू
मुंबईत जीम आणि रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत संबंधित मालक-चालकांसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. यामध्ये एक तृतीयांश उपस्थिती ठेवून जीम-रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, त्यानंतरच्या टप्प्यात धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.

इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने इकबाल सिंह चहल यांना ‘कोविड क्रुसेडर्स ऍवॉर्ड 2020’ पुरस्काराने आज गौरविण्यात आले. ‘प्रशासकीय अधिकारी’ या श्रेणीत हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत. कर्तव्य बजावताना पालिकेने 200 पेक्षा अधिक सहकाऱयांना गमावले आहे तर 5 हजारांपेक्षा अधिक सहकाऱयांना कोरोना झाला. पण आम्ही थांबलो नाहीत. असे उद्गार चहल यांनी काढले.

…तर फेब्रुवारीपर्यंत मुंबई पूर्ण अनलॉक!
मुंबईत मार्च महिन्यापासून असलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत आहे. दुकाने, बाजार, आस्थापने सुरू झाली आहेत. असे असताना कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे आयुक्त म्हणाले. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास कोरोना लवकरच नियंत्रणात येईल आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्ण अनलॉक करता येईल असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. मात्र हे सर्व नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे असेही ते म्हणाले. अनेक नागरिक मास्क घातल्याशिवाय फिरत असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली

आपली प्रतिक्रिया द्या